अतिक्रमणधारकांना तीन दिवसांचा अल्टिमेटम

अतिक्रमणधारकांना तीन दिवसांचा अल्टिमेटम

नांदगाव शहरातील व्यवसायिकांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून प्रशासनातील अधिकार्‍यांनी शहरातील विविध भागात विशेष नदीकाठच्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी टपर्‍या टाकून व्यवसाय थाटला असल्याने तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

८ सप्टेंबर रोजी नांदगाव शहरातील लेंडी नदी व शाकंबरी नदीला महापूर आला, यात लेंडीनदीवरील फरशीपुलावर असलेल्या टपर्‍या वाहून त्या अडकल्याने परिसरातील घरा-घरांत पाणी घुसले. तर डॉ. आंबेडकर चौक, गांधी चौक व फुले चौक आदी भागात पाणी आल्याने तेथील विविध वस्तूंच्या दुकानांमध्ये पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर व्यापार्‍यांनी मुख्याधिकारी विवेक धांडे यांना निवेदन देऊन निवेदनात भविष्यात पुन्हा असा प्रसंग घडू नये म्हणून त्वरित पावले उचलावीत, अन्यथा आम्हाला कोर्टाचे दार ठोठावे लागेल असे निवेदनात म्हटल्याने नगरपरिषदेने नदीकाठी असलेल्या टपरीधारक व्यवसायिकांना प्रत्यक्ष भेटून व त्यांचे मोबाईल नंबर घेवून तसेच त्यांचेशी संवाद साधून तीन दिवसात अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा नगरपरिषदेकडून काढण्यात येईल असे सांगितले. यावेहळी व्हिडीओदेखील काढण्यात आले.

ही मोहीम मुख्याधिकारी धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल कुटे, बंडू कायस्थ, गणेश पाटिल, अरुण निकम, श्रीमती मोरे, धनवटे, चोपडे, आनंद महिरे, वाघमारे, जाधव, पवार यांनी राबवली. या मोहिमेत सुमारे दीडशे व्यावसायिकांना तोंडी समज देण्यात आली आहे.

सर्वांना एकच नियम हवा

ज्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह छोट्या व्यवसायावर अवलंबून आहे व अशा व्यावसायिकांसाठी पर्यायी व्यवस्था, जागा द्यावी तसेच सर्वांनाच एकाच मापदंडात तोलण्यात यावे. जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही, अशी मागणीही व्यावसायिकांनी केली आहे.

First Published on: September 22, 2021 8:17 PM
Exit mobile version