आरटीई प्रवेशासाठी अंतिम तीन दिवस

आरटीई प्रवेशासाठी अंतिम तीन दिवस

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या १२ दिवसांत केवळ ४८ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, अजूनही जवळपास ५३ टक्के विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेशासाठी २६ एप्रिलपर्यंत मुदत असल्याने कागदपत्र जमवण्यासाठी पालकांची लगबग सुरू झाली आहे.

आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने ८ एप्रिलला पहिली लॉटरी जाहीर केली होती. त्यात समावेश असलेल्या ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी २6 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, ११ ते २० एप्रिल या दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये केवळ १ हजार ६७३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिल्या यादीतील प्रवेशासाठी आता फक्त तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे उर्वरित ५2 टक्के प्रवेश कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळूनही अनेक विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळू शकलेले नाहीत. यात प्रामुख्याने अर्ज करताना शाळा व घर यातील नोंदवलेले अंतर आणि गुगल मॅपिंगवरील अंतरातील तफावत, खोटे पत्ते, अपूर्ण कागदपत्रे, अर्जांमधील त्रुटी यांसह इतर विविध कारणांमुळे आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळे येत आहेत. त्यामुळेच पहिल्या लॉटरीत जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असली, तरी ११ ते २० एप्रिल या दहा दिवसांत केवळ १ हजार ६६३ प्रवेश झाले आहेत. हे प्रमाण अवघे ४७ टक्के एवढेच असून, पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळूनही अद्याप प्रवेश मिळू न शकलेल्या ५३ टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर निर्माण झाले आहे.

अर्ज बाद

आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी जिल्ह्यातील ४५७ शाळांतील ५ हजार ७३५ जागांसाठी तब्बल १४ हजार ९९५ अर्ज आले. ८ एप्रिलला पहिला लकी ड्रॉ काढण्यात येऊन पुढील प्रक्रियेसाठी पडताळणी समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर काही पालकांनी खोटे अंतर व कागदपत्रांचा मुद्दा उपस्थित करत तक्रार केली होती. त्यामुळे खोट्या पत्त्यांच्या आधारे सादर झालेल्या प्रवेश अर्जांची कसून तपासणी केल्यामुळे अनेक अर्ज या प्रक्रियेतून बाद झाले.

First Published on: April 23, 2019 11:55 PM
Exit mobile version