अवकाळी पावसाने घेतला तिघांचा बळी

अवकाळी पावसाने घेतला तिघांचा बळी

वादळी पावसामुळे शेतातील कोसळलेले शेड.

अवकाळी पावसाने जिल्ह्यात तिघांचा बळी घेतला असून, वादळामुळे काही ठिकाणी वीज खांब कोसळल्याने शहरासह ग्रामीण भागात सोमवारी रात्री व मंगळवारी वीजपुरवठा खंडित झाला होता. बागलाण तालुक्यात योगेश शिंदे या मेंढपाळाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. हा युवक साक्री जिल्हा धुळे येथील रहिवासी आहे. दिंडोरी तालुक्यातील मौजे आक्राळे येथे संपत उदार (वय ६५) यांच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. तसेच मालेगाव शहारातील व्यापारी विकास शामलाल अग्रवाल (वय ४५ ) घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीवर वादळी वार्‍यामुळे झाड उन्मळून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मालेगाव शहरात सोमवारी (१५ एप्रिल) रात्री सोसाट्याचा वादळ वारा सुरू झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. याच रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने झोडपायला सुरुवात केल्याने शहरात सर्वत्र वीज पुरवठा खंडीत झाला. विवेकानंद कॉलनी परिसरात राहणारे व्यापारी विकास शामलाल अग्रवाल (वय ४५ ) घरी परतत असताना गवती बंगला परिसरात त्यांच्या दुचाकीवर वादळी वार्‍यामुळे झाड उन्मळून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यासह शहरात पूर्व भागात टेन्शनचौकात एका रिक्षावर निंबाचे झाड कोसळले होते. सुदैवाने रिक्षाचालक बचावले. मंगळवारी सकाळीदेखील हजारखोली परिसरात डॉ. सुलेमान यांच्या घरावर झाड कोसळले. यासह शहरातील विविध रस्त्यांवर तसेच ग्रामीण भागात वादळी वार्‍यासह पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले होते. तर काही ठिकाणी वीज खांब कोसळल्याने शहरासह ग्रामीण भागात सोमवारी रात्री व मंगळवारी वीज पुरवठा खंडित झाला.

सोमवारी रात्री वडगाव येथे सोमवारी रात्री  भाऊसिंग विठ्ठल ठोके यांच्या शेतात वीज पडल्याने गुरांसाठी असलेल्या चार्‍यास आग लागली. आग पसरत गेल्याने या आगीच्या कचाट्यात लगतच असलेले उसाचे शेतदेखील आले. ठाणसिंग विठ्ठल ठोके यांच्या शेतातील एक एकरातील उस व कोंबडी खत जळून खाक झाले. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला व आग विझवली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, शेतकर्‍यांचे एक ते दीड लाखांचे नुकसान झाले आहे.

First Published on: April 16, 2019 10:00 PM
Exit mobile version