शहरात दोन घटनांमध्ये तिघे बुडाले, एकाचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरू

शहरात दोन घटनांमध्ये तिघे बुडाले, एकाचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरू

नाशिक : शहरात आज दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जण बुडाले आहेत. यातील एक जणाचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य दोघा बुडालेल्यांचा शोध सुरू आहे. एक घटना म्हसरुळ परिसरात घडली आहे तर दुसरी घटना सोमेश्वर धबधब्याच्या ठिकाणी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरासमोरील मोकळ्या जागेत खेळत असताना पडीक विहिरीत पडून ११ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कुणाल शिवदास पवार (रा, मांडवी सोसायटी, प्रभातनगर, म्हसरूळ, नाशिक) असे मृत मुलाचे नाव आहे. कुणाल राहत्या घरासमोरील मोकळ्या जागेत खेळत होता. त्याचवेळी जवळच असलेल्या पडीक विहिरीत तो पडला. त्यात पाणी असल्याने तो बेशुद्ध झाला. ही बाब ‘लक्षात आल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रोकडे करीत आहेत.

गंगापूररोडवरील सोमेश्वर धबधबा पाहण्यासाठी गेलेले दोघे गोदावरी नदीपात्रात बुडाले आहेत. आज दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. माहिती मिळताच नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. गंगापूर धरणातून गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीत ६०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे सोमेश्वर धबधबा खळाळतो आहे. सध्या कडाक्याचे ऊन असल्याने शीतलता मिळण्यासाठी आणि पोहण्यासाठी अनेक जण सोमेश्वर धबधब्याच्या ठिकाणी येत आहेत.

आज दुपारच्या सुमारास ४ मित्र सोमेश्वर धबधब्याच्या ठिकाणी आले. ते पोहणे आणि आंघोळीसाठी नदीपात्रज उतरले. मात्र, त्याचवेळी वाहत्या पाण्याचा आणि नदीपात्राच्या खोलीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे यातील दोन जण बुडाले. अन्य दोघांनी आरडाओरडा केल्याने तेथे उपस्थित असलेल्यांनी मदतीसाठी प्रयत्न केले. त्याचवेळी काही जणांनी मनपा अग्निशमन विभागाला तसेच पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बुडालेल्या दोघांना शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

First Published on: April 19, 2022 5:49 PM
Exit mobile version