तीन वर्षाचा चिमुकला शंभू थेट चौथ्या मजल्यावरून पडला; मात्र, झाले असे की…

तीन वर्षाचा चिमुकला शंभू थेट चौथ्या मजल्यावरून पडला; मात्र, झाले असे की…

नाशिक : येथील पंपिंग परिसरातील फ्लॅटमध्ये एकटेच झोपलेला तीन वर्षाचा चिमुकला चौथ्या मजल्याच्या गॅलरीतून तोल जावून खाली पडल्याने एकच खळबळ उडाली. नागरिकांनी बेशुद्ध अवस्थेतील चिमुकल्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. आश्चर्य म्हणजे, त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला.

चेहेडी पंपिंग परिसरातील भगवा चौक परिसरातील साई आदेश सोसायटीत राहणारा शिवांश (शंभू) पुरुषोत्तम गोरडे (वय ३) सोमवारी (दि.२४) संध्याकाळी चारच्या सुमारास झोपलेला होता. त्यावेळी घराचा दरवाजा लावून त्याची आई पूनम मुलीला क्लासला सोडविण्यासाठी गेली होती. तितक्यात शंभू झोपेतून उठून गॅलरीत आला. त्यावेळी तोल जावून तो खाली पडला. मात्र, दुसर्‍या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीवर दोन फूट रुंद पत्र्याच्या छतावर आदळल्याने मोठा आवाज झाला. त्यानंतर तो पेव्हर ब्लॉकवर पडला. चौथ्या मजल्यावरुन पडल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी धाव घेतली.

शंभू बेशुद्ध अवस्थेत असताना दीपक गुरव, अनिल दराडे, बबलू ताजनपुरे व नागरिकांनी तातडीने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच शंभूची आई व नातेवाईकांनी हंबरडा फोडत रुग्णालयाकडे धाव घेतली. तीन वर्षाचे शंभू उंचावरून पडल्याने पालकांच्या पायाखालची जमीन हादरली होती. मात्र, वैद्यकीय तपासणीत शंभूच्या शरीरात कोणतीही गंभीर इजा दिसून येत नाही. त्याच्यावर उपचार व तपासणी सुरु असल्याचे वडील पुरुषोत्तम गोरडे यांनी सांगितले.

फ्लॅटच्या गॅलरीला तीन फुटाची रेलिंग आहे. तो झोपलेला असल्याने मुलीला क्लासला सोडवायला गेले. गॅलरीतून तो खाली कसा पडला हे समजले नाही. मात्र, दैव बलवत्तर म्हणून मुलाचा जीव वाचला. : पूनम गोरडे, शंभूची आई

First Published on: July 25, 2023 5:31 PM
Exit mobile version