वणीच्या ट्रामा केअर सेंटरला लालफितीसह तांत्रिक त्रुटींचे ग्रहण

वणीच्या ट्रामा केअर सेंटरला लालफितीसह तांत्रिक त्रुटींचे ग्रहण

दिंडोरी येथील ट्रॉमा केअर सेंटर

वणी ट्रामा केअर सेंटरचे काम दप्तर दिरंगाईने रखडले असून हे काम पूर्ण होण्याची वाट पंचक्रोशीतील नागरिक बघत आहेत. दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा, चांदवड तालूक्यातील नागरिकांचा वणीच्या ग्रामीण रुग्णालयात नेहमीच राबता असतो. वणीपासून साधारणतः ३० ते ४० किलोमीटर अंतरावर ही गावे असून आदिवासी उपयोजनेअंतर्गत आहेत.

पाच तालूक्याचा संपर्क वणी येथे असतो. या ठिकाणी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे. परंतु, गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी नाशिकला हलवण्यात येते. अपूरे कर्मचारी आणि औषधसाठा यांचा ताळमेळ बसत नाही. वणीशी दळणवळणाचा संबध येत असल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. २००७ मध्ये वणी परिसरात मोठा अपघात झाल्याने जीवीतहानी झाली होती. या पार्श्वभूमीवर वणी ट्रामा केअर सेंटरची मागणी झाल्याने २०११ ला निधी उपलब्ध होऊन दोन कोटींचे अंदाजपत्रक बनवले. यात ३० बेड, दोन मोठे वार्ड, स्त्री- पूरुष स्वतंत्र कक्ष, एक आयसीयु कक्ष, एक छोटे शस्त्रक्रियागृह, चार डॉक्टरांसाठी कॅबीन, सहा परिचारीकांसाठी सुश्रृषा केंद्र अद्यावयत शस्त्रक्रिया गृह, सीटी स्कॅन, डिजिटल एक्स-रे मशिन, दोन जनरल मेडिकल ऑफिसर, एक अस्थिव्यंग शल्य चिकित्सक, दोन भुलतज्ञ, एक परिसेविका, तीन अधिपरिचारिका, एक वाहनचालक, चतुर्थश्रेणी सेवक तीन, सफाई कर्मचारी दोन, अशी टीम ट्रामा केअरसाठी लागणार आहे. इमारतीचे काम ८० टक्के पूर्ण झाले असले तरी परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, इमारतीसमोर रुग्णांना बसण्यासाठी , पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

क्ष- किरण कक्ष छोटे असून त्याचा दरवाजा अरूंद आहे. शस्त्रक्रिया विभागाच्या बाजूला हात धुण्यासाठी जागा नाही. एसी बसविण्यासाठी योग्य जागा नाही. यामुळे इमारत ताब्यात घेणे हे सर्वतोपरी नियमांच्या बाहेर असल्याने उपविभागीय अभियंता बांधकाम उपविभाग दिंडोरी यांचेकडून कुठलीही गुणवत्ता तपासणी अहवाल प्राप्त न झाल्याने इमारत ताब्यात घेऊ शकत नसल्याचे पत्र वैद्यकिय अधिक्षकांनी दिले. दरम्यान, ट्रामा केअर सेंटर सुरु होण्याची मागणी आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली होती. दरम्यान, तांत्रिक बाबीमुळे ट्रॉमा केअर सेंटरची पूर्तता होणे प्रशासकीय स्तरावर अडचणीचे ठरू पाहत आहे. 100 खाटांच्या रुग्णालयाचा प्रारंभ या इमारतीत करण्याची मागणी पुढे आली आहे.

First Published on: July 14, 2019 8:05 AM
Exit mobile version