होर्डिंगसाठी वृक्षबळी; सव्वा लाखांचा दंड

होर्डिंगसाठी वृक्षबळी; सव्वा लाखांचा दंड

नाशिक : उंटवाडी येथील म्हसोबा मंदिर प्रांगणातील महानगरपालिकेच्या जागेतील झाडे मागील बाजूस असलेले आपले होल्डिंग दिसावे म्हणून कापल्या प्रकरणी नम्रता अ‍ॅडव्हर्टायजिंगच्या मच्छिंद्र देशमुख यांना नोटिस बजावण्यात आली आहे. नंदिनी नदीच्या बाजूला नव्याने उभारण्यात येत असलेल्या होर्डिंग्ज दिसावेत यासाठी देशमुख यांनी १ कडुनिंब, १ वड, १ पिंपळ असे एकूण तीन वृक्ष बुडापासून तोडले होते. याबद्दल त्यांना दंडाची नोटिस बजावण्यात आली आहे.

या नोटिसीत देशमुख यांना १,२५,००० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. निसर्ग सेवक युवा मंचच्या अमित कुलकर्णी यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर पश्चिम विभागाच्या वृक्ष अधिकार्‍यांनी ही कारवाई केली आहे. महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि.१६) देशमुख यांना ही नोटिस बजावण्यात आली आहे. याबाबत उत्तर देण्यासाठी त्यांना ३ दिवसांची मुदत देण्यात आलेली होती. मात्र, सोमवारपर्यंत (दि.१९) त्यांनी नोटिसच स्वीकारली नसल्याने आता महानगरपालिका प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे शहरातील पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आर्थिक उत्पन्नापोटी शहरात वाट्टेल तेथे होर्डिंग्ज उभारण्याच्या उद्योगांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून अशा होर्डिंग्जवर धडक कारवाईची गरज आहे.

आम्ही याबाबत तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेने जी तत्परता दाखवली त्याचे स्वागतच आहे. यापुढेही महानगरपालिकेने वृक्षतोडीबाबत अशीच तत्परता दाखवावी जेणेकरून निसर्गाचा र्‍हास करणार्‍यांवर जरब बसू शकेल. त्याचसोबत नंदिनी नदीपात्रात उभ्या राहत असलेल्या होर्डिंग्जची तात्काळ चौकशी होऊन हे होर्डिंग्ज उभारणार्‍यांवरही पालिकेने कठोर कारवाई करावी. : अमित कुलकर्णी, अध्यक्ष, निसर्ग सेवक युवा मंच

First Published on: September 20, 2022 2:40 PM
Exit mobile version