अबब ! शहरात अडीच हजार खड्डे; बुजविण्यासाठी तब्बल ३० कोटींचे बजेट

अबब ! शहरात अडीच हजार खड्डे; बुजविण्यासाठी तब्बल ३० कोटींचे बजेट

नाशिक : शहरात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची वाट लागली असून, महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी तातडीने रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील तब्बल 2,670 खड्डे येत्या चार दिवसांत पेव्हर ब्लॉकच्या वापरातून तातडीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अंदाजपत्रकातील 30 कोटी रुपयांची तरतूद खर्च केली जाणार आहे.

गेल्या पाच वर्षात रस्त्यांवर जवळपास साडेसहाशे कोटी रुपये खर्च करूनदेखील रस्ते सुस्थितीत नसल्याने गुणवत्तेचे पितळ उघडे पडले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांवरून नागरिकांकडून ओरड सुरू झाल्यानंतर बांधकाम विभागाला तातडीने रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना आयुक्त पवार यांनी दिल्या. काही ठिकाणी त्यांनी स्वतः पाहणी केली. एकदा रस्ता तयार झाल्यानंतर तीन वर्षांसाठी संबंधित ठेकेदाराला देखभाल दुरुस्ती बंधनकारक आहे. त्यानुसार नव्याने तयार करण्यात आलेल्या 200 किलोमीटर अंतरातील 34 रस्त्यांची पाहणी आयुक्तांनी केली. अपवाद वगळता रस्ते सुस्थितीत दिसून आले.

पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्त्यावरचा लेअर संबंधित ठेकेदारांकडून तातडीने दुरुस्त करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील 2200 किलोमीटर रस्त्यांवर एकूण 6270 खड्डे असल्याचे सर्वेक्षण अंतिम निश्चित करण्यात आले. त्यातील 3600 खड्डे तातडीने भरण्यात आले तर, 2670 खड्डे येत्या चार दिवसांत बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तंत्रज्ञानाच्या आधारे खड्डे बुजवावे, ढोबळमानाने खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक किंवा मुरूम टाकू नये अशा सूचना आयुक्तनी दिल्या. खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक टाकताना चौकोनी खड्डा करावा, अन्यथा पेव्हर ब्लॉक बाहेर पडल्यास त्याची जबाबदारीदेखील ठेकेदारांवर निश्चित केली जाणार आहे.

 

First Published on: July 19, 2022 2:13 PM
Exit mobile version