आणखी दोन उंटांचा मृत्यू; प्रशासनाची चिंता वाढली, आतापर्यंत ८ उंटांनी गमावले प्राण

आणखी दोन उंटांचा मृत्यू; प्रशासनाची चिंता वाढली, आतापर्यंत ८ उंटांनी गमावले प्राण

नाशिक : राजस्थानहून दाखल झालेल्या उंटांच्या मृत्युच्या घटना वाढत असून शुक्रवारी दोन आणि शनिवारी एक अशा तीन उंटांचा पांजरापोळमध्ये मृत्यु झाला. मालेगावमध्ये आतापर्यंत एक अशा आतापर्यंत आठ उंटांचा मृत्यु झाला. त्यामुळे आता उर्वरित उंटांच्या प्रकृतीबाबत अधिकची काळजी घेतली जात असून राजस्थानहून आणतांना या उंटांना गेली अनेक दिवसांपासून अन्नपाण्यावाचून ठेवल्याने मृत्युच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रातील वातावरण उंटांना मानवत नसल्याने तसेच त्यांचे अन्न पाणीवेगळे असल्याने पांजरापोळमध्ये ते जास्त काळ जगू शकणार नाही. याकरीता प्रशासनाकडून त्यांना पुन्हा राजस्थानला पाठविण्याची तयारी करण्यात येत आहे. याकरीता खास सिरोही येथून रायका (पशुपालक) यांना पाचारण करण्यात आले आहे. दाखल झालेल्या उंटांपैकी ४३ उंट हे मालेगावच्या नीळगव्हाण येथील गोशाळेत आश्रयास आहेत. तर १११ उंट हे चुंचाळे येथील पांजरापोळमध्ये आहेत. १११ पैकी आता केवळ १०४ उंट पांजरापोळच्या जंगलात असून नाशिकमधील ७ उंटांचा मृत्यु झाला आहे.

शनिवारी पांजरापोळमधील आणखी एका उंटाचा मृत्यु झाला. तर मालेगावमध्येही एका उंटाचा मृत्यु झाला. नाशिक आणि मालेगावमध्ये दाखल झालेल्या एकूण १५४ उंटांपैकी नाशिकच्या पांजरापोळमध्ये आतापर्यंत ७ तर मालेगाव येथील गोशाळेत १ अशा ८ उंटांचा मृत्यू झाला असून १४६ उंट जीवंत असून दररोज वाढत्या मृत्यूच्या घटनांमुळे प्रशासनाची चिंता वाढली असून या उंटांचे लसीकरण करण्यात येत आहे. उंटांना परत पाठविण्यासाठी राजस्थानच्या सिरोही येथून खास रायकांना पाचारण करण्यात आले आहे. हे रायका दोन दिवसांत नाशकात दाखल होणार असून त्यांच्या मार्फत हे उंट राजस्थानच्या दिशेने रवाना होणार आहेत.

First Published on: May 13, 2023 7:13 PM
Exit mobile version