स्मार्ट स्कूल योजनेंतर्गत महापालिकेचे ‘मिशन अ‍ॅडमिशन; शाळाबाहय मुलांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न

स्मार्ट स्कूल योजनेंतर्गत  महापालिकेचे ‘मिशन अ‍ॅडमिशन; शाळाबाहय मुलांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न

नाशिक : शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने नाशिक महापालिका शिक्षण विभागाने स्मार्ट स्कूल अंतर्गत ‘मिशन अ‍ॅडमिशन’ मोहीम हाती घेतली आहे. या माध्यमातून वंचित घटकातील मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, शाळांमधील पटसंख्या वाढवणे हे उद्दीष्ठ्य असल्याचे प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी सांगितले.
नाशिक महानगरपालिकेच्या ‘स्मार्ट स्कूल’ या महत्वाच्या प्रकल्पांतर्गत ६९ शाळांचे ६५६ वर्ग डिजिटल होणार आहेत.

वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असतानाच महापालिका शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी ‘मिशन अ‍ॅडमिशन’ मोहीम राबविली जात आहे. सध्या शिक्षकांच्या पालकांसमवेत बैठका सुरू आहेत. लवकरच ‘शाळा प्रवेश उत्सव’ सुरू होणार आहे. प्रवेशपात्र विद्यार्थी आणि पालकांना शाळेत बोलावून त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांची शाळा प्रवेश प्रक्रियेची तयारी करून घेतली जाणार आहे. सर्व शाळांची पटसंख्या जास्तीत जास्त वाढविण्यासाठी प्रत्येक वर्गात किमान ५० विद्यार्थी असे उद्दीष्ठ्य मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाला देण्यात आले आहे. पालिकेच्या प्राथमिक ८८ व माध्यमिक १२ अशा एकूण १०० शाळा आहेत. त्यात सुमारे २९ हजार पटसंख्या आहे. ही मोहीम यशस्वीपणे राबवून पटसंख्या ५० हजारांपर्यंत नेण्याचे उद्दीष्टय आहे. एकूण ८९६ शिक्षक असून प्राथमिकचे ८३८ आणि माध्यमिकचे ५८ शिक्षक आहेत.

‘स्मार्ट स्कूल’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे पालिकेच्या शाळांना उर्जितावस्था प्राप्त करुन देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या शाळांमधून तळागाळातील आर्थिकदृष्टया दुर्बल तसेच वंचित घटकांतील मुला-मुलींना विनामूल्य शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. हे शिक्षण सर्वार्थाने गरजू मुला-मुलींपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मिशन अ‍ॅडमिशन’ ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे प्रशासनाधिकारी धनगर यांनी सांगितले.

स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत डिजिटलाईज शिक्षणाच्या सर्व सोयी अंतर्भूत आहेत. शाळांचे बाहेरून सुशोभीकरण करण्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी. महापालिकेच्या शाळा दर्जेदार शिक्षणाची केंद्रे बनवत आणि पटसंख्या वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत, असे आवाहन शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी सर्व शाळांना केले आहे.

First Published on: April 13, 2023 1:38 PM
Exit mobile version