एक एकरावरील वांगी अज्ञात व्यक्तींनी तोडून फेकली

एक एकरावरील वांगी अज्ञात व्यक्तींनी तोडून फेकली

इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील शेतकरी माधव किसन आडोळे यांच्या एक एकर क्षेत्रावरील वांग्याच्या शेतीची अज्ञात समाजकंटकांनी रात्रीच्या वेळी विळा व कोयत्याने तोडून संपूर्ण नासधूस केली. मोठा भांडवली खर्च करून नुकतेच फळधारणा झालेले वांगे रात्रीतून भुईसपाट झाल्याने संबंधित शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या समाजकंटकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.

माणिकखांब येथील शेतकरी माधव आडोळे यांनी मोठ्या कष्टाने एक एकर क्षेत्रात पंचगंगा जातीची सुमारे तीन हजार वांग्याची रोपे लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी शेतात मल्चिंग पेपर लावून अत्याधुनिक पद्धतीने ड्रीप सिस्टम तयार केला होता. त्यांना त्यासाठी जवळपास ५० हजार खर्च आला होता. महागड़ी औषधे, खतेही त्यांनी दिली. अलिकडेच या झाडांना फळधारणा झाली होती. सध्या नाशिकसह इतर बाजारात वांगी तेजीत असून साधारण चारशे ते पाचशे रुपये प्रतिजाळी दर मिळतो आहे. त्यानुसार अंदाजे तीन ते चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, त्यापुर्वीच अज्ञातांनी त्यांच्या पिकांचे नुकसान केल्याने आडोळे हतबल झाले आहेत. अशा विघातक प्रवृत्तींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.

First Published on: September 27, 2020 6:52 PM
Exit mobile version