विनामास्क दंड एक हजारऐवजी २०० रुपये

विनामास्क दंड एक हजारऐवजी २०० रुपये

नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी रविवारी (दि.१४) सुधारित आदेश काढत बेशिस्त नागरिकांना केला जाणार्‍या दंडाच्या रकमेत बदल केला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विनामास्क वावर करणार्‍या बेशिस्त नागरिकांना आता एक हजारऐवजी दोनशे रुपये दंडा द्यावा लागणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना महापालिकेतर्फे केल्या जात आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीवर कारवाई करण्याची सूचना महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत. त्यानुसार विनामास्क वावरणार्‍या नागरिकांवर एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, काही नागरिक आर्थिक परिस्थितीमुळे एक हजार रुपये दंड भरण्यास टाळाटाळ करत असल्याचा अभिप्राय पोलीस आणि महापालिकेच्या पथकाकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई अडचणी निर्माण होत आहे. विनामास्क असलेल्या नागरिकांवर कारवाई करताना महसूल गोळा करणे हा उद्देश ठेवू नये. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून दंडात्मक कारवाई करावी. या कारवाईमुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनेची व्याप्ती वाढविणे हा उद्देश आहे. त्यामुळे दंडाच्या रकमेत बदल करण्याचा सुधारित आदेश आयुक्त जाधव यांनी काढला आहे. त्यानुसार अधिकारी व कर्मचार्‍यांनी विनामास्क नागरिकास दोनशे रुपये दंडात्मक कारवाई करावी. चलन पुस्तके व दंडाचा लेखाशिर्ष संबंधित विभागीय अधिकार्‍यांकडून वितरीत करण्यात येणार आहे. साप्ताहिक दंडाचा भरणा विभागीय अधिकार्‍यांमार्फत महापालिका कोषागारात जमा करावा. पोलीस विभागाकडील दंडात्मक कारवाईतून जमा झालेल्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम दरमहा पोलीस कल्याण निधीमध्ये जमा करण्यात येईल. कार्यवाहीची अहवाल घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे दर आठवड्यास सादर करावा, असे आयुक्त जाधव यांनी आदेशात म्हटले आहे.

First Published on: March 14, 2021 9:54 PM
Exit mobile version