अमेरीकेतील करोनामुळे सॉफ्टवेअर कंपन्या धोक्यात

अमेरीकेतील करोनामुळे सॉफ्टवेअर कंपन्या धोक्यात

नाशिक : करोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून, अमेरीकेत परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने भारतातील सॉफ्टवेअर कंपन्या धोक्यात सापडल्या आहेत. या कंपन्यांचे 40 टक्के काम घटल्यामुळे भविष्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढण्याची भिती वर्तवली जाते. राज्यातील सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये कामाचा वेग आता झपाट्याने कमी होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील तब्बल 60 टक्के सॉफ्टवेअर कंपन्या अमेरीकेसोबत काम करतात. वर्षभराचा करार केल्यानंतर दैनंदिन काम पूर्ण करण्याचे टार्गेट सेट केले जाते. त्यामुळे नियमित कामाचा प्रभाव असलेल्या कंपन्यांमध्ये तीन शिफ्टमध्ये काम चालत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे आता एका शिफ्टमध्ये आणि तेही घरुनच काम करावे लागते. अशा परिस्थितीत काम वेळेत पूर्ण होत नसल्याने क्लायंटचे समाधान होताना दिसत नाही. अमेरीकेतही लॉकडाऊन आहे. भारतापेक्षा तिकडची परिस्थिती अधिक बिकट असल्याने त्यांच्याही कामाचा वेग मंदावला असून, परिणामी भारताच्या सॉफ्टवेअर कंपन्यांचे उत्पन्न 30 ते 35 टक्क्यांनी घटले आहे. साधारणत: एका महिन्यात 40 टक्के वर्कलोड कमी झाला असून, लॉकडाऊन वाढत गेल्यास हा प्रभाव अधिकाधिक कमी होत जाईल. कामच कमी होणार असेल तर कर्मचार्‍यांचे प्रमाणही घटेल. त्यामुळे भविष्यात बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या या क्षेत्रात उद्भवणार असल्याचे जाणवते. मात्र, तीन ते चार महिन्यांनी पुन्हा हे क्षेत्र उभारी घेईल आणि ही उणिव भरुन काढेल असा विश्वास नाशिक इन्फॉर्मेशन टेन्कॉलॉजी असोसिएशनचे (नीटा) अध्यक्ष अरविंद कुलकर्णी यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.
&
एका शिफ्टमध्ये काम
नाशिकमध्ये 180 सॉफ्टवेअर कंपन्यांमधील सुमारे 10 हजार कर्मचारी सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ प्रमाणे काम करत आहेत. त्यांच्या कामाचा वेग आता हळुहळु कमी होत असून दररोज तीन शिफ्टमध्ये काम करणार्‍या कंपन्या एका शिफ्टवर पोहोचल्या आहेत. अत्यावश्यक गोष्टींसाठी काही कर्मचार्‍यांना घरुनच काम करावे लागते. परंतु, एकाच शिफ्टमध्ये हे काम होत असल्याने घेतलेली कामे वेळेत पूर्ण करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
…प्रतिक्रिया
लॉकडाऊनच्या काळात कामाचे प्रमाण कमी होत असल्याने या क्षेत्रातील नोकर्‍या कमी होतील, असे दिसते. सध्या खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होत असल्याने 40 टक्के नफा घटला आहे. परंतु, तीन ते चार महिन्यांनंतर परिस्थिती सुधारेल आणि नोकर्‍याही वाढतील.
-अरविंद कुलकर्णी, अध्यक्ष (नीटा)

First Published on: April 16, 2020 6:48 PM
Exit mobile version