नाशिक ग्रामीण पोलीस भरतीमध्ये ‘बायोमेट्रिक’चा वापर

नाशिक ग्रामीण पोलीस भरतीमध्ये ‘बायोमेट्रिक’चा वापर

नाशिक : आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर १६४ पोलीस शिपायांच्या जागांसाठी बुधवार(दि.४)पासून भरतीप्रक्रिया सुरु झाली आहे. पोलीस भरतीमध्ये डमी उमेदवार आढळून येवू नये, यासाठी ‘बायोमेट्रिक’ पद्धतीचा वापर केला जात आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी, ऊंची व छातीचे मोजमाप घेतल्यानंतर गोळा फेक चाचणी देण्याआधी उमेदवाराचे ‘बायोमेट्रिक थंब’ घेतले जात आहे.

राज्यात जिल्हानिहाय पोलीस भरतीप्रक्रियेस सुरुवात झाली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलात १७९ पोलीस पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी तब्बल २१ हजार ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. मैदानावर पोलीस प्रवर्गनिहाय उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणी करत आहेत. या भरतीवेळी उमेदवार मोठ्या संख्येने येेणार असल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे भरतीप्रक्रियेसह कडक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. उमेदवारांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. गोळा फेक, १००, १६०० मीटर धावणे चाचणीचे चित्रीकरण केले जात आहे. गुणांसह चाचणीच्या तपशिलांचे फलक मैदानावर दर्शनी भागात लावण्यात आले आहेत.

नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर बुधवारी (दि.४) पहिल्याच दिवशी १३०० पैकी ८०६ उमेदवारांनी शारीरिक चाचणी परीक्षेसाठी हजेरी लावली. या ठिकाणी सोमवारी (दि.२) व मंगळवारी (दि.३) १५ पोलीस चालक पदासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. या शारीरिक व मैदानी चाचणी परीक्षेस दोन दिवसांत एक हजार २२ उमेदवारांनी हजेरी लावली. या उमेदवारांची नियोजित वेळेनुसार लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ९८४ म्हणजे ४० टक्के उमेदवार चाचणी परीक्षेस गैरहजेरी राहिले.

पोलिसांकडून राबविण्यात येणार्‍या भरती प्रक्रियेत डमी विद्यार्थ्यांचा प्रकार टाळण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा वापर केला जात आहे. भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची गोळा फेक चाचणीच्या वेळी उमेदवारांचे बायोमेट्रिक थंब घेतली जात आहे. गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षेच्या वेळी पुन्हा बायोमेट्रिक थंब घेतले जाणार आहे. त्यामुळे डमी विद्यार्थी परीक्षेला आला तरी तात्काळ पकडला जाणार आहे.

एसपींकडून उमेदवारांच्या शंकांचे निरसन

पोलीस भरतीप्रक्रियेवेळी ज्या उमेदवारांना कागदपत्रांसह इतर अडचणी येत आहेत. त्यांच्या शंकांचे निरसन तक्रार निवारण कक्षात न झाल्यास अपर अधीक्षक माधुरी कांगणे व पोलीस अधीक्षक शहाजी उमाप करत आहेत. परिणामी, उमेदवारांचे तात्काळ शंकांचे निरसण होत असून, त्यांना शारीरिक चाचणी देता येत आहे.

मैदानावर झेरॉक्स सुविधा

नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या भरतीसाठी धुळे, जळगाव, नंदूरबार, परभणीसह इतर जिल्ह्यातून उमेदवार येत आहेत. कागदपत्रे पडताळवेळी उमेदवारांकडे मूळ कागदपत्रे असले तरी झेरॉक्स नसेल तर त्यांना अडचणी येते. त्यासाठी मुख्यालयाच्या मैदानावार झेरॉक्स मशीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना तात्काळ झेरॉक्स दिल्या जात आहेत.

First Published on: January 5, 2023 3:14 PM
Exit mobile version