सतर्कतेचा इशारा; गंगापूर धरणातून ८ हजार क्युसेक विसर्ग

सतर्कतेचा इशारा; गंगापूर धरणातून ८ हजार क्युसेक विसर्ग

नाशिक : जिल्ह्यासह शहरात आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. गंगापूर धरणातून दिवसभरात ८ हजारांहून अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदाकाठी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वेळोवेळी विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी (दि.१६) सायंकाळनंतर पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. शनिवारी (दि.१७) दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती.

मात्र, रात्री पुन्हा सुरू झालेली संततधार रविवारी (दि.१८) दिवसभर सुरू होती. त्यामुळे सकाळपासूनच गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू होता. ऐन पितृपक्षात गोदाकाठ, रामकुंड परिसर पाण्याखाली गेल्याने भाविकांसह स्थानिक विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे. अनेकांनी आधीच टपर्‍या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्या आहेत. त्यामुळे सर्वांनाच पाऊस थांबण्याची प्रतीक्षा आहे.

संततधारेने बळीराजा चिंतेत

शेतीच्या कामांसाठी पावसाने उघडीप देणे अपेक्षित आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या आदल्या दिवसापासून सुरू झालेला पाऊस आजही थांबण्याचे नाव घेत नसल्याने पेरणी, छाटणी, फवारणी अशी अनेक शेतीकामे खोळंबली आहेत. काही ठिकाणी तर अतिपावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.

असा झाला विसर्ग (क्युसेक)

गंगापूर – ८ हजार
दारणा – १०,५६२
कादवा – ३३४८
मुकणे – १०८९
पालखेड – ५५३८
आळंदी – ४४६

First Published on: September 19, 2022 2:18 PM
Exit mobile version