कोरोनाग्रस्त कुटुंबाला ग्रामस्थांनी केली मदत

कोरोनाग्रस्त कुटुंबाला ग्रामस्थांनी केली मदत

कोरोनाने गेल्या दीड-दोन वर्षांपासून जगभरासह भारतात मोठ्या प्रमाणावर धूमाकुळ घातला आहे. अनेक समाजसेवी संस्था व विविध समाज घटकांनी आपापल्या परीने पंतप्रधान व मुख्यमंत्री फंडात निधी जमा करून शासनास मदत केली.तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून व आपण देखील समाजाचे काही देणे लागतो. या उद्देशाने विष्णूनगर येथील तरुणांनी व ग्रामस्थांनी एकत्र येत कोरोना निधी संकलन करण्यास सुरूवात केली. या जमलेल्या निधी मधून ब्राम्हणगाव (विंचूर) येथील कोरोनाग्रस्त कुटुंबाला मदत करण्यात आली.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. बर्‍याच कुटुंबांतील कर्तेपुरुष गेल्याने लहान-लहान मुलं अनाथ झाली. असेच ब्राम्हणगाव (विंचूर) येथील जाधव कुटुंब.या कुटुंबातील मोहन जाधव यांचे गेल्या दीड महिन्यापूर्वी कोरोनाने निधन झाले. मोहन जाधव यांची घरची परीस्थिती हलाखीची असल्याने ते ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत परंतु दीड महिन्यापूर्वी मोहन जाधव यांचा कोरोनाने बळी घेेतल्याने जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

घरात वृद्ध आई, पत्नी तसेच तीन व पाच वर्षाचे दोन मुलं असा परिवार आहे. याबाबतची बातमी प्रसिद्ध झाल्याने विष्णूनगर तरूणांनी संकलन केलेला कोरोना निधी जाधव कुटुंबाला देण्याचे ठरविले. त्यानंतर ब्राम्हणगावचे सुनील गवळी व मंगेश गवळी यांच्याशी संपर्क साधून ब्राम्हणगाव ग्रामपंचायतमध्ये जावून आई जनाबाई व पत्नी पूजा यांच्याकडे १० हजाराचा संकलन निधी देण्यात आला.

यावेळी हेमंत घायाळ, सूर्यभान घायाळ, ज्ञानेश्वर शेळके, विठ्ठल घायाळ, दीपक घायाळ, हरीभाऊ देसले, ज्ञानेश्वर घायाळ, रघुनाथ जेऊघाले, एकनाथ जेऊघाले, सुनील गवळी, मंगेश गवळी आदी उपस्थित होते.

First Published on: June 10, 2021 3:41 PM
Exit mobile version