वॉर्डबॉयचा महिला डॉक्टरवर कात्रीने हल्ला; डॉक्टर गंभीर जखमी

वॉर्डबॉयचा महिला डॉक्टरवर कात्रीने हल्ला; डॉक्टर गंभीर जखमी

नाशिक : रुग्णांना पुरविण्यात येणार्‍या सुविधांबाबत तक्रारी आल्याने जाब विचारल्याच्या कारणातून वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर कात्रीने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (दि.२५) रात्री ८.३० वाजता निम्स हॉस्पिटल, गंगापूर रोड येथे घडली. या हल्ल्यात महिला डॉक्टर जखमी झाली आहे. पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली आहे. न्यायालयाने वॉर्डबॉयला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

अनिकेत डोंगरे (रा.संत कबीरनगर, भोसला स्कूलच्या मागे, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित वॉर्डबॉयचे नाव आहे. डॉ. सोनल अविनाश दराडे असे जखमी डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गंगापूर रोडवरील केबीटी चौकात निम्स हॉस्पिटलमध्ये सुकदेव आव्हाड यांची बहीण डॉ. सोनल दराडे कार्यरत आहेत. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना वॉर्डबॉयमार्फत सेवा दिल्या जातात. मात्र, संशयित अनिकेत डोंगरेबाबत काही रुग्णांनी डॉक्टरांकडे तक्रारी केल्या होत्या. याप्रकरणी डॉ. सोनल दराडे यांनी वॉर्डबॉय अनिकेतला कामातील हलगर्जीपणाबाबत विचारणा केली. राग अनावर झाल्याने त्याने डॉ. दराडे यांच्या केबिनमध्ये येत त्यांच्यावर कात्रीने हल्ला केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ ऑपरेशन थिएटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी सुकदेव नामदेव आव्हाड (रा. शांतिनिकेतन कॉलनी, प्रसाद मंगल कार्यालयाजवळ, गंगापूर रोड) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक नितीन पवार करत आहेत.

First Published on: December 28, 2022 10:37 AM
Exit mobile version