इगतपुरीला धरण ‘फुल्ल, तरी पाण्यासाठी रोजचेच मरण!

इगतपुरीला धरण ‘फुल्ल, तरी पाण्यासाठी रोजचेच मरण!

धरण

विक्रमी पावसामुळे सर्वच धरणे ओव्हरफ्लो असं घडणार्‍या एकमेव इगतपुरी तालुक्यात मात्र पंचायत समिती प्रशासनाचं दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सरत्या वर्षाला निरोप देताना पिण्याच्या पाण्याचा शोध घेण्याची केविलवाणी वेळ आली आहे. चहूबाजूला धरणे, या धरणामुळे तालुक्याला भेदून जाणार्‍या भाम, वाकी खापरी व दारणा या दुथडी भरून वाहणार्‍या नदया. धरणातील पाण्याच्या भरवशावर पारंपरिक भात पिकाला फाटा देऊन सर्वत्र रुजवलेली बागायती पिके यामुळे हिरवागार झालेला परिसर असे चित्र इगतपुरी तालुक्यात सर्वच भागात पाहण्यास मिळते. मात्र याच चित्राचा विरोधाभास म्हणून भल्या पहाटे उठून, दुपारच्या रखरखत्या उन्हात, डोक्यावर हंडा घेऊन, पिण्याचे पाणी शोधण्यासाठी महिलांची धडपड अनेक ठिकाणी पाहण्यास मिळते.

वैतरणा, दारणा, कडवा, या महाधरणाबरोबर, भावली, भाम, वाकीखापरी, शेणवड ही धरणे. निम्मी मुंबई आणि मराठवाड्याची तहान भागवणारा हा तालुका इगतपुरी पंचायत समिती प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि लोकप्रतिनिधीमुळे पाण्यासाठी उपेक्षित आहे. इगतपुरी तालुक्यात पूर्व भागात मायदरा,वासाळी आदी भागात पाणीटंचाई चा आरंभ झाला असून पाणीपुरवठा योजना नामधारी ठरल्या आहेत.

पाणीदार नेतृत्वाची गरज

एकीकडे मराठवाड्याला पाणी मिळावे यासाठी मराठवाड्याचे सर्व लोकप्रतिनिधी पक्ष संघटना विसरून संघटित होतात आणि दुसरीकडे दारणा धरण समूहातून पाणी देण्याला काही पक्षांनी नामधारी विरोध दर्शविल्याने तालुक्यातुन पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने हक्काचे पाणी गमविण्याची वेळ आली आहे.यासाठी तालुक्याला पाणीदार नेतृत्वाची गरज असल्याचे बोलले जात आहे.

First Published on: January 4, 2019 8:00 AM
Exit mobile version