महावेधद्वारे हवामानाचा अचूक अंदाज मिळणार

महावेधद्वारे हवामानाचा अचूक अंदाज मिळणार

महावेधद्वारे हवामानाचा अचूक अंदाज मिळणार

लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी एक दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली आहे. ‘महावेध’ या नावाने स्वयंचलित हवामान यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकर्‍याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असून त्यानुसार पिकांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे आणि नुकसान कसे टाळावे याचे तंत्र शेतकर्‍यांना सहज साध्य होणार आहे. यासंदर्भात नुकतीच मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यातील सर्व निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची बैठक घेण्यात येऊन माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक महसूल मंडळात एक अशी 2060 स्वयंचालित हवामान केंद्रे स्थापन केली असून त्याद्वारे गावस्तरापर्यंतच्या शेतकर्‍याला हवामानाचा अचूक अंदाज आणि माहिती प्राप्त होणार आहे. हवामानाशी संबंधित सूचना आणि अचूक माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने अशी एक विकेंद्रित व्यवस्था उभी करण्याची ही संकल्पना होती. आपल्या राज्यात शेती हवामानावर आधारित आहे. गेल्या काही वर्षांतील हवामानातील वाढत्या बदलामुळे अवेळी पाऊस, गारपीट, वादळ, यांचा तडाखा पिकांना बसून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही स्वयंचलित हवामान यंत्रणा स्कायमेट या हवामानाचे अंदाज वर्तवणार्‍या कंपनीच्या सहकार्याने सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर बसवण्यात आली आहे. सध्या राज्यात हवामानाचे अंदाज वर्तवणार्‍या आठ मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून हवामानाविषयी सर्वसाधारण माहिती आणि अंदाज वर्तवले जातात.

या स्वयंचलित हवामान यंत्रणेमुळे वार्‍याची नेमकी गती किती आहे आणि ते कोणत्या दिशेने वाहत आहेत ते कळेल, तसेच हवेतील तापमान, सापेक्ष आर्द्रता पावसाचे प्रमाण, याविषयीची माहिती शेतकर्‍यांना देखील गावनिहाय कळेल. ही यंत्रणा कार्यरत झाली आहे तेथे हवामानाची अचूक माहिती प्रत्येक दहा मिनिटांच्या अंतराने एकत्रित करण्याची व्यवस्था पुणे येथील कृषी महाविद्यालयात करण्यात आली आहे. महसुली मंडळांच्या ठिकाणी ही स्वयंचलित यंत्रणा बसवल्यामुळे स्थानिक स्तरावर शेतकर्‍यांना माहिती देणे सोपे जाणार आहे.

कृषी अधिकारी देणार माहिती

यासाठी कृषी अधिकार्‍यांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिला जाईल म्हणजे ते जिल्ह्यांच्या वेबसाईटवर माहिती टाकू शकतील आणि ग्रामपंचायत कार्यालयामार्फत शेतकर्‍यांना हवामानाची पूर्वसूचना देऊ शकतील. या स्वयंचलित हवामान यंत्रणेच्या माध्यमातून संकलित माहितीचा उपयोग करून विशिष्ट क्षेत्रांसाठी योग्य कृषी व्यवस्थापन करण्याचा सल्ला देणे सोपे होईल. नैसर्गिक संकटांच्या काळात आपत्ती व्यवस्थापन करणे सहज शक्य होईल. तसेच पीकविमा योजनांचे व्यवस्थित नियोजन करता येईल आणि हवामानाच्या माहितीची बँक तयार करता येणार आहे.

First Published on: July 10, 2019 11:59 PM
Exit mobile version