शहरातील गुन्हेगारीला ‘अंकुश’ कधी लागणार?; नागरिक भीतीच्या छायेत

शहरातील गुन्हेगारीला ‘अंकुश’ कधी लागणार?; नागरिक भीतीच्या छायेत

दिलीप कोठावदे । नाशिक 

एकामागे एक घडणार्‍या गुन्हेगारी घटनांनी नाशिक शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. शहरात कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे दहशत आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. त्यामुळे शहरात पोलीस यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे.

पोलीस यंत्रणेच्या दुर्बलतेमुळे नाशिकच्या मंत्रभूमी, यंत्रभूमी, कुंभनगरी, वाईनसिटी, द्राक्षपंढरी या बिरुदावलीमध्ये आता क्राईम सिटी या नावाचाही समावेश होऊ लागला आहे. शहरात गाड्याची तोडफोड व जाळपोळ, कोयते तलावरी नाचवत टोळक्याचा धुडगूस, तर कधी भररस्त्यात धारदार शस्त्राने खून, कधी दोन गटात लाठ्या-काठ्या, तलावरी घेऊन हाणामारी तर कधी जुन्या भांडणाची कुरापत काढून प्राणघातक हल्ला, एटीम मशीनची चोरी, बँकेच्या स्ट्राँगरुमचा स्लॅब तोडून दरोड्याचा प्रयत्न करण्याची गुन्हेगारांची हिंमत वाढली. हे सर्व शांत, सुसंस्कृत धार्मिक शहर असणार्‍या नाशिकमध्ये घडत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या अधिपत्याखाली नाशिकमध्ये चार पोलीस उपायुक्त, सात सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबरसह चौदा पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक असे ७० हून अधिक पोलीस अधिकारी व हजारो पोलीस कर्मचार्‍यांचा ताफा तैनात आहे. तरीही, नाशिककरांचे जीवन सुरक्षित राहिलेले दिसत नाही.
नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी अंकुश शिंदे यांची नोव्हेंबर २०२२ मध्ये नियुक्ती झाल्यानंतर शहरातील हाणामार्‍या, चोर्‍या,वाहनांची तोडफोड व जाळपोळीच्या घटना तसेच खुनासारख्या गंभीर प्रकारांवर काहीतरी ’अंकुश’ लागेल अशी अपेक्षा होती.

मात्र, आयुक्तांच्या केवळ नावातच ‘अंकुश’ असल्याचे सातत्याने घडणार्‍या गुन्हेगारी घटनांनी वारंवार सिद्ध केले आहे. गेल्या सहा-सात महिन्यात शहरात २२ हून अधिक खूनाच्या घटना घडल्या असून भांडणे, अपापसातल्या हाणामार्‍या, पूर्ववैमनस्यातून घडणार्‍या घटनांमुळे पोलिसांचा शहरात वचक राहिला नसल्याचे समोर आले आहे. नाशिक शहरातील गुन्हेगारी सातत्याने वाढतच असतानाच पोलिसांकडून गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी ठोस कारवाई होताना दिसत नाही. गुन्हेगारीवर पोलिसांचा ‘अंकुश’ राहिला नसल्याचे वाढत्या गुन्हेगारीवरून समोर आले आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असून, नाशिककरांवर दहशतीच्या छायेत जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आली आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पोलीस यंत्रणा सुरक्षित जगणे देऊ शकत नसल्याची भावना निर्माण होत आहे.
नाशिक दत्तक घेण्याची घोषणा करणारे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान गृहमंत्र्यांनी आतातरी आपल्या अधिपत्याखाली असलेल्या गृहखात्याच्या माध्यमातून नाशिककडे लक्ष देऊन किमान येथील वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावा आणि नाशिककरांना त्यांच्या मनात असलेल्या सुखेनैव जीवनाचा आनंद घेऊ द्यावा, अशी मागणी नाशिककर करत आहेत.

‘सिव्हिल’मध्ये आठवड्याभरात दुसर्‍यांदा बंदोबस्त

अंबडमधील संजीवनगर येथील खंडेराव मंदिर, शिवनेरी चौकात १० ऑगस्ट रोजी रात्री १२ जणांच्या टोळक्याने दोन तरुणांचा खून केला. या घटनेनंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी (दि.१७) पुन्हा अंबडमध्ये खून झाल्याने जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्याता आला होता. यामुळे रुग्णालय आवारात तणावमय परिस्थिती निर्माण झाली होती.

दीड महिन्यात गुन्हेगारीच्या घटना

७ जुलै : शिंगाडा तलाव परिसरात दोन गटात हाणामारी.
९ जुलै : नाशिकरोडला एटीएम मशीनची चोरी
१० जुलै : अंबडच्या महाकाली चौकात दोन गटात लाठ्या काठ्या दांडक्याने तुफान हाणामारी
१२ जुलै : नवीन नाशिक मधील शिवशक्ती नगर परिसरात १६ गाड्यांची तोडफोड
१६ जुलै : उंटवाडी परिसरात टोळक्याकडून तरुणावर तलवारीने हल्ला
१६ जुलै : पवननगरमध्ये वडापाव विक्रेत्यावर हल्ला.
२० जुलै : अंबडमध्ये इंडियन बँकेवर दरोडयाचा प्रयत्न
२२ जुलै : बोधले नगर परिसरात तरुणावर भररस्त्यात वार करून खून.
२४ जुलै : विहितगाव परिसरात मध्यरात्री १८ गाड्यांची तोडफोड व जाळपोळ,तरुणांचा धुडगूस,
२५ जुलै : मध्यरात्री धोंगडेनगर परिसरातील जगताप मळा भागात पुन्हा ६ गाड्यांची तोडफोड
२८ जुलै : रोजी भरोसा सेलमध्ये पत्नीच्या मामाने पोलिसांसमोरच पतीवर चाकूहल्ला केला होता.
१० ऑगस्ट : सातपूर-अंबड लिंकरोडवर दोन तरुणांचा खून
१६ ऑगस्ट : पंचवटीत वाहनाची तोडफोड.
१६ ऑागस्ट : होलाराम कॉलनीत लिव्ह इन रिलेशनशिप मधील प्रेयसीचा प्रियकराने केला खून
१६ ऑागस्ट : अंबडमध्ये भरदिवसा तरुणाचा खून

First Published on: August 18, 2023 2:27 PM
Exit mobile version