कांदा अनुदान कधी मिळणार?; नाशिक जिल्ह्यात तब्बल दीड लाख शेतकरी प्रतीक्षेत

कांदा अनुदान कधी मिळणार?; नाशिक जिल्ह्यात तब्बल दीड लाख शेतकरी प्रतीक्षेत

नाशिक : मागील फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात कांद्याचे भाव गडगडल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने शेतकरयांना अनुदान देण्याचे जाहीर केले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार १२९ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरवले. या शेतकर्‍यांच्या अनुदानापोटी ४३५ कोटी ६१ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाच्या पुणे येथील पणन विभागाकडे सादर केला आहे.यामुळे आता येत्या काही दिवसातच कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट शासकीय अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.

उन्हाळयात कांद्याचे भाव कोसळल्याने उत्पादन खर्चही शेतकर्‍यांच्या हाती आला नाही.यामुळे शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकर्‍यांना दिलासा मिळावा या हेतूने शासनाने प्रति क्विंटल कांद्याला साडे तीनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती.असे असले तरी अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना कांदा अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. कांदा अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा व्हावी यासाठी खा. गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत कांदा उत्पादक शेतकर्‍यांना त्यांच्या अनुदानाची रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी गळ घातली होती.

काय आहेत आकडेवारी

जिल्ह्यातील तालुका स्तरावरील कृषी उत्पन्न बाजार समित्या, थेट पणन परवानाधारक, खाजगी बाजार आणि नाफेड या संस्थांमार्फत या दोन महिन्यात वरील चारही संस्थांकडून एक कोटी चोवीस लाख ४६ हजार क्विंटल कांदा खरेदी करण्यात आला होता.कांद्याचे अनुदान मिळावे यासाठी जिल्हाभरातून १,९३,८१८ शेतकर्‍यांनी अर्ज केले होते. जिल्हा प्रशासनाच्या छाननीमध्ये २१,६६६ शेतकरी अपात्र ठरले असून १ लाख ५८ हजार १२९ शेतकरी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकर्‍यांच्या अनुदानाची रक्कम ४३५ कोटी ६१ लक्ष २३ हजार ५७८ रुपये झाली आहे.

First Published on: July 24, 2023 7:13 PM
Exit mobile version