नाशिक पदवीधर निवडणुकीत कौल कुणाला?; गुरवारी होणार फैसला

नाशिक पदवीधर निवडणुकीत कौल कुणाला?; गुरवारी होणार फैसला

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणूक सुरूवातीपासूनच चर्चेत आली ती अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीने. दोन्ही उमेदवार अपक्ष असले तरी, शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठींबा दर्शवला तर, भाजपने अखेरपर्यंत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली असली तरी सत्यजीत तांबे यांना भाजपने छुपा पाठींबा दिला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे याबाबत मतमोजणीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

सत्यजित यांचे भाजप नेत्यांशी चांगले संबंध होते. त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात ‘अशा चांगल्या माणसांना मोकळे ठेवू नका, नाहीतर आमचा डोळा राहतो. चांगले नेते भाजपला हवेच आहेत’, अशी टिप्पणी केली होती. इथूनच खर्‍या अर्थाने तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा झडू लागल्या. मात्र पदवीधर निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच अनेक राजकीय घडमोडी घडल्या. काँग्रेसने आ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी देवूनही तांबे यांनी स्वतः अर्ज दाखल न करता आपले पुत्र सत्यजीत तांबे यांचा अर्ज दाखल करण्यास हजेरी लावली. तर दुसरीकडे भाजपकडे तीन उमेदवारांनी अधिकृत उमेदवारी मागूनही भाजपने या निवडणुकीत उमेदवार न दिल्याने भाजपचा पाठींबा तांबे यांनाच असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात झडू लागली. त्यातच नगर जिल्हयातून विखे यांनी भूमीपुत्राच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिला तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे सांगत याबाबत भूमिका गुलदस्त्यातच ठेवलीआमदार सुधीर तांबे यांनी तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतांना जपलेले ॠणानुबंध, सत्यजीत यांच्यासारखे युवा नेतृत्व, काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना माननणारा वर्ग याचा फायदा साहजिकच सत्यजीत यांना होतांना दिसून येत आहे. अपक्ष निवडणूक लढवतांना सत्यजीत तांबे यांनी वैयक्तिक प्रचार यंत्रणा उभी केली. स्वतः आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मतदारांशी फोनव्दारे वैयक्तिक संपर्क साधला.

तर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना शिवसेना उद्धव ठाकरे यांनी पांठिबा दिल्याने शिवसैनिकांनी दिवसभर मतदान केंद्रावर थांबून मतदारांना मदत केली. शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने साथ दिली. परंतु काँग्रेसचे पदाधिकारी हे मतदान केंद्रावर दिसून न आल्याने शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तांबे यांच्यासाठी भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना आणि काँग्रेसचे छुपे पदाधिकारी हे तांबेच्या मतदान केंद्रावर दिसून येत होते. तर धुळे येथील शुभांगी पाटील यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ऐनवेळी पाठिंबा दिल्याने प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. पाठींबा मिळविण्यात झालेला विलंब तसेच प्रचारासाठी मिळालेला कालावधी पाहता शुभांगी पाटील या बहुतांश मतदारांपर्यंत पोहचल्याच नाही. तर दुसरीकडे काँग्रेसकडून विरोध जरी होत असला तरी, भाजपकडून मिळणारी छुपी साथ, थोरात आणि डॉ. तांबे यांनी पसरवलेले जाळे यामुळे तांबे यांचा विजय सुकर मानला जात आहे. त्यामुळे आता कोणी कोणाला पाठींबा दिला? कोण कोणाचे काम केले? याबाबत गुरूवारी होणार्‍या मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

First Published on: January 31, 2023 5:37 PM
Exit mobile version