‘पालिकेला कोणी डांबर देत का डांबर’; खड्डेप्रश्नी मनसेचे अनोखे आंदोलन

‘पालिकेला कोणी डांबर देत का डांबर’; खड्डेप्रश्नी मनसेचे अनोखे आंदोलन

नाशिक : पावसाळा आला, पावसाळा गेलाही, दरम्यानच्या काळात गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, दिवाळी असे महत्वपूर्ण सण-उत्सवही पार पडले. परंतु, नाशिककरांची अद्यापही रस्त्यावरील खड्ड्यांपासून मुक्तता झालेली नाहीये. मागील ६ महिन्यात नागरिकांना या खड्ड्यांमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नवीन नाशिक परिसरात तर रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिति निर्माण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवीन नाशिक परिसरात पडलेल्या खड्ड्यांच्या बाबत मागील ६ महिन्यात अनेकदा आवाज उठवला, निवेदन दिली, आंदोलने केली, नागरिकांना सोबत घेत मोर्चा काढला, अधिकार्‍यांना घेराव घातला. परंतु, तरीही ढीम्म प्रशासन कोणताही प्रतिसाद देत नाही. आंदोलन करत निवेदन दिले की तात्पुरत्या स्वरुपात दिखाव्या पुरते रस्त्यावरील खड्डे बुजवले जातात. काही दिवसात पुन्हा बुजवलेले खड्डे उघडे पडतात. याविरोधात आता मनसेच्या पदाधिकार्‍यांनी ‘महानगरपालिकेला कोणी डांबर देत का डांबर’ अश्या घोषणा देत, स्वखर्चाने मुरूम टाकून उपहासात्मक आंदोलन केले.

नवीन नाशिक मधील पूर्वीचा प्रभाग २९ मधील विजयनगर ते बडदे नगर रस्त्यावर मागील ६ महिन्यापासून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. याबाबत मनसेचे शहर संघटक अर्जुन वेताळ, देवचंद केदारे ,वाहतूक सेना उपाध्यक्ष प्रविण महाले, मनविसे शहर सचिव शंकर कनकुसे, दुर्गादास परदेशी, राहुल खैरनार, ईश्वर कदम यांनी वेळोवेळी महानगर पालिकेच्या नवीन नाशिक विभागीय कार्यालयात निवेदन देऊन रस्त्यांची दुरूस्ती तसेच डांबरीकरण करण्याची मागणी केली. मात्र, त्यावर योग्य ती उपायोजना होत नसल्यामुळे अखेर स्वखर्चाने मुरूम टाकून ”महानगरपालिकेला कोणी डांबर देत का डांबर’ अश्या घोषणा देत पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला

First Published on: November 4, 2022 7:40 PM
Exit mobile version