महिलेचा विधानभवनबाहेर नाशिक पोलिसांविरोधात आत्मदहनाचा प्रयत्न

महिलेचा विधानभवनबाहेर नाशिक पोलिसांविरोधात आत्मदहनाचा प्रयत्न

नाशिक : विधानभवनाबाहेर महिलेने नाशिक शहर पोलीस तक्रार घेत नसल्याप्रकरणी शुक्रवारी (दि.२४) अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे विधानभवनाबाहेर गोंधळ निर्माण झाला होता. राजलक्ष्मी पिल्ले असे पीडित महिलेचे नाव असून, त्या युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा आहेत.

विशेष म्हणजे, ९ ऑगस्ट २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील नाशिक दौर्‍यावर असताना पिल्ले यांनी पोलीस आयुक्तालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. मुंबईत हिवाळी अधिवेशन सुरु असून, विधानभवनाबाहेर पिल्ले यांनी शुक्रवारी सकाळी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पोलिसांनी वेळीच त्याना रोखले. तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तांसह नाशिक शहर पोलिसांना सातत्याने भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस आयुक्त भेटत नाही की पोलीस तक्रार दाखल करुन घेत नाहीत.

नाशिक शहर पोलीस गुन्हेगारांना आश्रय देण्याचे काम करीत आहेत. पोलिसांकडून कुटुंबियांवर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले जात आहेत. पोलीस आम्हाला न्याय देत नाहीत. याप्रकरणात न्याय मिळण्यासाठी विधानभवन येथे आली असल्याची पिल्ले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राजलक्ष्मी पिल्ले यांनी पतीसह ऑगष्ट २०२१ मध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

First Published on: December 24, 2021 7:50 PM
Exit mobile version