मॅडम, पाण्याचे टँकर लवकर पाठवा हो…

मॅडम, पाण्याचे टँकर लवकर पाठवा हो…

पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागतेय.

नांदगाव परिसरात पाण्यासाठी सकाळपासूनच रानावनात भटकंती करुनही पाणी मिळत नाही, तर हातपंपही कोरडेठाक पडल्याने कुठेच पाणी मिळत नाही. मॅडम, शक्य झाले तर पाण्याचे टँकर लवकर पाठवा हो… अशी आर्त विनवणी तालुक्यातील वडाळी खुर्द येथील महिलांनी तहसीलदार भारती सागरे यांच्याकडे केली.

तालुक्यातील वडाळी खुर्द येथे तहसीलदार भारती सागरे यांच्या दुष्काळ पाहणी दौर्‍याप्रसंगी महिलांनी अनेक व्यथा मांडल्या. गेल्यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे संपूर्ण तालुक्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी नागरिकांसह जनावरांचे हाल होत असल्यामुळे अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. यासाठी तहसीलदार भारती सागरे यांच्यासह पथकाने यापूर्वी अनेक गावांमध्ये भेट देऊन पाहणी केली आहे. या पाहणी दौर्‍यादरम्यान तहसीलदार सागरे या वडाळी खुर्द येथे पोहोचल्या होत्या. त्यावेळी गावाबाहेर असलेल्या मुख्य हातपंपाजवळ बसलेल्या काही महिलांशी त्यांनी चर्चा केली. त्यावेळी उपस्थित महिलांपैकी एका महिलेने तहसीलदार सागरे यांच्यासमोरच हातपंप हापसला बराच वेळ हापसा चालवून देखील घोटभर पाणी आले नाही, असे सांगत महिलांनी पाण्यासाठी भटकंतीची व्यथा मांडली. दरम्यान, रानावनातल्या विहिरीदेखील कोरड्याठाक पडल्याचे सांगत आता तरी प्रशासनाने वडाळी खुर्द येथे देखील पाण्याचे टँकर पुरवावे, अशी मागणी केली. याप्रसंगी तहसीलदार सागरे यांनी महिलांशी चर्चा केल्यानंतर ग्रामसेवक निकम यांच्यासोबत चर्चा करुन गावातील पाणीटंचाईचा आढावा घेतला. याशिवाय पाणीटंचाई निवळण्यासाठी कुठल्या उपाययोजना राबविता येतात का? याबाबत माहिती जाणून घेतली.

या पाहणी दौर्‍याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून संबंधित विभागाशी चर्चा करुन लवकरच वडाळी खुर्द ग्रामस्थांसाठी टँकरव्दारे पाणीपुरवठा करु, असे आश्वासन तहसीलदार सागरे यांनी ग्रामस्थांना दिल्या. यावेळी वडाळी खुर्दचे सरपंच फरताळे, महसूल विभागाचे प्रमोद साळुंके, तलाठी लोंढे, ग्रामसेवक वाय.एस. निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

First Published on: February 15, 2019 3:14 PM
Exit mobile version