एक हजार वर्षांनंतर दिसणार दीर्घ खंडग्रास चंद्रग्रहण

एक हजार वर्षांनंतर दिसणार दीर्घ खंडग्रास चंद्रग्रहण

नवीन नाशिक:या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण शुक्रवारी (दि.१९) दिसणार असून, तब्बल एक हजार वर्षांनंतर येणारे हे सर्वात मोठे आंशिक चंद्रग्रहण असल्याने खगोल शास्त्रज्ञासाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात अरुणाचल प्रदेश व आसाम या ईशान्येकडील राज्यांसह काही काळ दिल्लीतही दिसणार आहे.

भारताव्यतिरिक्त आफ्रिका, पश्चिम युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागरावर दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार १९ नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण सकाळी ११.३४ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ५.३३ वाजता संपेल. हे आंशिक चंद्रग्रहण असून खगोल अभ्यासकांच्या मतानुसार, पृथ्वीची सावली चंद्रावर ५ तास ५९ मिनिटे इतका वेळ राहाणार आहे. या शतकातील हे सर्वात दीर्घकाळ चालणारे चंद्रग्रहण असेल. हवामान अनुकूल असल्यास चंद्र जिथून बाहेर येईल, तिथे हे अद्भुत खगोलीय दृश्य पाहायला मिळेल.

यापूर्वी असे दीर्घकालीन ग्रहण १८ फेब्रुवारी १४४० मध्ये दिसल्याची नोंद असून, पुढील काळात असे दीर्घकालीन चंद्रग्रहण पाहण्यासाठी ८ फेब्रुवारी २६६९ सालची प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे एका अद्भुत खगोलीय घटनेचे साक्षीदार होण्याची आपल्यासाठी ही शेवटची संधी असल्याचे मानले जात आहे.ज्योतिष अभ्यासकांच्या मते प्राचीनकाळापासून चंद्र किंवा सूर्यग्रहणाच्या काळात काही प्रथा पाळल्या जातात. आजही अनेक लोक या प्रथांचं पालन करतात. हिंदू पंचांगानुसार, वर्षातील हे दुसरे चंद्रग्रहण विक्रम संवत २०७८ मध्ये कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी वृषभ राशी आणि कृतिका नक्षत्रात लागणार आहे. हे ग्रहण भारतात सावलीच्या रूपात असल्याने या चंद्रग्रहणाचा सूतक कालावधी राहणार नाही. सुतक काळात स्वयंपाक करणे आणि पूजा करणे इत्यादी टाळले जाते. ज्योतिषतज्ज्ञांच्या मतानुसार या ग्रहणामुळे प्रामुख्याने वृषभ, कन्या, वृश्चिक, धनु आणि मेष या पाच राशींवर परिणाम होणार आहे.

२०२१ मधील शेवटचे चंद्रग्रहण ; दिवसा असेल चंद्रग्रहण

४ डिसेंबरला सूर्यग्रहण : या वर्षातील पहिले चंद्रग्रहण२६ मे रोजी झाले, तर दुसरे चंद्रग्रहण १९ नोव्हेंबरला होणार आहे. यानंतर, वर्षातील दुसरे व शेवटचे सूर्यग्रहण ४ डिसेंबरला होईल. या वर्षातील हे भारतातील शेवटचे चंद्रग्रहण असेल. पुढील चंद्रग्रहण सुमारे वर्षभरानंतर म्हणजेच ८ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतात खग्रास चंद्रग्रहणाच्या स्वरुपात दिसणार आहे.

First Published on: November 15, 2021 4:12 PM
Exit mobile version