हॉटेलच्या मजल्यावरुन पडल्याने तरुणाचा मृत्यू

हॉटेलच्या मजल्यावरुन पडल्याने तरुणाचा मृत्यू

नवीन नाशिक : हॉटेलमधील मजला चढत असताना अंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे जात जाऊन ३५ फूट खाली दगडांवर पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सिम्बायोसिस महाविद्यालयाशेजारील हॉटेल एक्सलन्स इन येथे शनिवारी (दि.२५) रात्री घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी निष्काळजीपणा करणार्‍या हॉटेल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे. विनोद सुखदेव गीते (30, रा. मोती चौक, सावतानगर, अंबड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद गीते हा हॉटेल एक्सलन्स इनमध्ये शनिवारी रात्री वरच्या मजल्यावर जात होता. त्याठिकाणी सुरू असलेल्या बांधकामामुळे तोडलेल्या भागाचा अंदाज न आल्याने तोल जाऊन तो ३५ फूट खोल खड्ड्यात पडला. खड्ड्यातील दगडांवर आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हॉटेल एक्सलन्स इनच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू असून, त्यासाठी मागील भागात जेसीबीच्या सहाय्याने २० फूट खोल खड्डा खोदण्यात आला असून त्यालगतच्या वरच्या मजल्यावरील कठडे व भिंतीचा काही भाग तोडण्यात आलेला होता.

मात्र, हॉटेल व्यवस्थापनाने या ठिकाणी सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याने गलथानपणामुळेच विनोदचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. या घटनेला हॉटेल व्यवस्थापनच जबाबदार असल्याने त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पोलीस उपनिरीक्षक शेवाळे पुढील तपास करत आहेत.

First Published on: December 27, 2021 8:40 AM
Exit mobile version