झेडपीच्या शंभर शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमसाठी पंतप्रधान मोदींना साकडे

झेडपीच्या शंभर शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमसाठी पंतप्रधान मोदींना साकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत व्हर्च्युअल क्लासरुम संकल्प मांडताना जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, उदय सांगळे व खासदार हेमंत गोडसे.

जिल्हा परिषदेमार्फत प्रायोगिक तत्वावर सामाजिक बांधिलकी (सीएसआर) या उपक्रमातून उपलब्ध होणार्‍या निधीतून व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना शंभर शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी गुरुवारी (दि.1) दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या उपक्रमाचे प्रात्यक्षिक सादर केले.
व्हर्च्युअल क्लास रूमबाबत सांगळे यांनी खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, युवानेते उदय सांगळे यांच्या समवेत मोदी यांची भेट घेऊन या उपक्रमाचे संगणकीय सादरीकरण केले. नाशिक जिल्ह्याने त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्यास महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अशा पद्धतीने व्हर्च्युअल क्लासरूम हा उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. शहर व गाव यांच्यातील दरी कमी करण्यासाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूमचा प्रयोग नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न असल्याचे शीतल सांगळे यांनी यावेळी नमूद केले. नाशिकच्या केंद्रातून एकाचवेळी विविध तज्ञांकडून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी विविध सामाजिक व सेवाभावी संस्था, जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व तज्ञ शिक्षकांचा सहभाग घेण्यात येणार असल्याचे सांगळे यांनी सांगितले.

असा आहे उपक्रम

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या १०० शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर या उपकमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी रुपयांपर्यंतचा निधी कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकी (सीएसआर) उपक्रमांतर्गत जमा करण्यात येणार आहे. यातून निवडलेल्या शाळांना व्हर्च्युअल क्लासरूमसाठी संगणक, एलईडी देण्यात येणार आहेत.

First Published on: August 1, 2019 8:39 PM
Exit mobile version