‘माझ्या वडिलांवरील आरोप खोटे…’, मुलगी नताशा आव्हाडची प्रतिक्रिया, तर महिला आयोगाने मागवला अहवाल

‘माझ्या वडिलांवरील आरोप खोटे…’, मुलगी नताशा आव्हाडची प्रतिक्रिया, तर महिला आयोगाने मागवला अहवाल

भाजपच्या पदाधिकारी महिलेच्या तक्रारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आव्हाडांविरोधात दाखल झालेल्या या गुन्ह्यानंतर महाराष्ट्रभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ करत आंदोलन केली. आज स्वत: आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आव्हाडांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अशातच आता जितेंद्र आव्हाडांची मुलगी नतशा आव्हाड हिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तीने माझ्या वडिलांवर आरोप खोटे आणि धक्कादायक असल्याचे म्हटले. (natasha awhad daughter reaction on fir against jitendra awhad rupali chakankar)

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नताशाने सांगितले की, “माझ्या वडिलांवर जो आरोप करण्यात आला आहे, तो अतिशय धक्कादायक आहे. या आरोपांमुळे माझ्या परिवाराला मानसिक त्रास होतो आहे. काल रात्रीपासून माझे वडील आणि आम्ही झोपलेलो नाही. राजकारणात असे वादविवाद होत राहतात. या पद्धतीने जेव्हा तुम्ही आरोप करता, तेव्हा त्याचा परिणाम एका व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण परिवारावर होत असतो. महिलांच्या सुरक्षेसाठी हे कायदे बनवले आहेत. मात्र, याचा गैरवापर होत असेल तर त्याचा परिणाम इतर महिलांवरही होतो”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाडने दिली.

महिला आयोगाने मागवला अहवाल

याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी यांनी आरोप केलेल्या महिलेच्या विरोधात महिला आयोगात तक्रार केला आहे. याबाबत रूपाली चाकणकर यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “ऋता जितेंद्र आव्हाड यांचा तक्रार अर्ज आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कलम ३५४ चा खोटा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दबावतंत्र वापरुन दाखल केला असल्याने सदर गुन्हा रद्द करुन फिर्यादी महिलेवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून कायदेशीर कारवाई करावी असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तरी सदर प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचेकडून मुळ फिर्यादी महिलेने दाखल केलेला गुन्हा आणि परस्परविरुद्घ प्राप्त झालेले तक्रार अर्ज या दोन्हीबाबत सत्यता पडताळून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविण्यात येत आहे”, असे त्यांनी म्हटले.

रविवारी रात्री कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. त्यामुळं आव्हाडांना प्रचंड टीकेला सामोरो जावे लागत आहे.


हेही वाचा – उद्या सकाळपर्यंत अटक करू नका, ठाणे न्यायालयाचा आव्हाडांना दिलासा

First Published on: November 14, 2022 11:04 PM
Exit mobile version