Video : नवनीत राणांचा लीलावती रुग्णालयातून व्हिडिओ संदेश!

Video : नवनीत राणांचा लीलावती रुग्णालयातून व्हिडिओ संदेश!

खासदार नवनीत राणा मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सगळ्यांचीच चिंता वाढली होती. विशेषत: त्यांच्या मतदारसंघातून त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या जात होत्या. त्यात त्यांना ICU मध्ये ठेवल्याचं समजल्यामुळे चिंता अधिकच वाढली होती. मात्र, आता नवनीत राणा आयसीयूमधून बाहेर आल्या असून त्यांना General Ward मध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांनी स्वत: त्यासंदर्भात माहिती देणारा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. रुग्णालयात बेडवर झोपलेल्या असतानाच त्यांनी हा व्हिडिओ जारी केला असून त्यामध्ये ‘आपली प्रकृती चांगली असून लवकरच आपल्या सेवेत पुन्हा रुजू होईन’ असं त्या म्हणत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडल्याचं बोललं जात आहे.

काय म्हटलंय या व्हिडिओमध्ये नवनीत राणांनी?

‘तुमच्या प्रार्थनांमुळेच मी आज मरता मरता वाचले आहेत. गेल्या ५-६ दिवसांमध्ये अमरावती, नागपूर, मुंबई ते आयसीयू असा प्रवास केला. आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर मी हेच सांगायला हा व्हिडिओ करत आहे की कालपासून मला बरं वाटत असून तुम्ही चिंता करू नका. माझी मुलं माझी काळजी करत होते. त्यांनी देखील हा व्हिडिओ पाहावा. मी केलेली चांगली कामं आणि तुमच्या प्रार्थना माझ्या पाठिशी होत्या. अजून चांगली कामं करायला मिळावीत म्हणून मला दुसरी संधी देवाने द्यायला हवी, अशी मागणी मी करत होते. तुमच्याच आशीर्वादाने मी आज वाचले आहे. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद’, असा संदेश नवनीत राणा यांनी या व्हिडिओमध्ये दिला आहे.

नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या परिवारातल्या १२ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे खळबळ उडाली होती. त्या सर्वांवर नागपूरमध्ये रुग्णालयात उपचार सुरू असून नवनीत राणा यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आधी नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात आणि तिथून मुंबईत लिलावतीमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ६ ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं. सुरुवातीला ५ दिवस घरीच उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती बिघडल्यामुळे ११ ऑगस्ट रोजी त्यांना नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथेही प्रकृती खालावल्यामुळे अखेर त्यांना मुंबईला हलवण्यात आलं.

कोरोना काळातला नवनीत राणांचा व्हायरल व्हिडिओ!

First Published on: August 15, 2020 6:41 PM
Exit mobile version