फडणवीसांच्या काळात डिजीटल दलाल, लवकरच घोटाळे बाहेर काढणार; नवाब मलिकांचा इशारा

फडणवीसांच्या काळात डिजीटल दलाल, लवकरच घोटाळे बाहेर काढणार; नवाब मलिकांचा इशारा

महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारासाठी सॉफ्टवेअरचा वापर करत असल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केला आहे. यावर आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आक्रमक भूमिका घेत थेट भाजपला इशारा दिला आहे. फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल होता. फडणवीस सरकारच्या काळात काय-काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढू, अशा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला असता तर अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात दिसलं असतं, असं वक्तव्य माध्यमांशी बोलताना केलं. यावर नवाब मलिक यांनी उत्तर देताना भाजपला इशारा दिला आहे. पूर्ण मंत्रिमंडळ तुरूंगात टाका. जनता पाहतेय, बंगालमध्ये जनतेनं जे ऊत्तर दिलं तेच ऊत्तर तुम्हाला इथे मिळेल, असं नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस, केंद्रातील मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. जम्मू काश्मीरमध्ये होणारे दहशतवादी हल्ले, पेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव, महागाई, शेतकरी आंदोलन या मुद्यावरुन नवाब मलिकांनी भाजप आणि संघावर निशाणा साधला.

पेट्रोल डिझेलने शतक मारलं आहे. यूपीएच्या काळात ६० रुपये होते तेव्हा यावर प्रश्न उपस्थित करत होते. भाजपवाले त्यावेळी सत्ता आली की पेट्रोल डिझेलचे दर कमी करु, असं आश्वासन देत होते. संसद चालू देणार नाही ही भूमिका घेत होते. आता मोदींनी सांगावं की दर का वाढले? यूपीएच्या काळात भाजपवाल्यांनी तेव्हा थयथयाट केला, दिल्लीच्या निवडणुकीत मोदींनी सांगितलं की माझ्या नशिबांनी किंमत कमी झाली आता सांगा कुणाच्या नशिबानं किंमत वाढतेय? असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला.

 

First Published on: October 17, 2021 1:18 PM
Exit mobile version