प्रवीण दरेकर यांच्यावर फौजदारी कारवाई करा, नवाब मलिकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रवीण दरेकर यांच्यावर फौजदारी कारवाई करा, नवाब मलिकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई जिल्हा मध्यवर्ती अर्थात मुंबै बँकेवर मजूर संवर्गातून संचालक म्हणून निवडून गेलेले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने अपात्र ठरवल्याने त्यांच्यावर फौजदारी संहितेनुसार कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत दरेकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व म्हणजे २१ जागा निवडून आल्या आहेत. त्यात दरेकर यांचा समावेश आहे. मात्र, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले आणि राज्य सरकारकडून वेतन आणि भत्त्यापोटी महिना दोन ते अडीच लाख उत्पन्न असलेले दरेकर मजूर कसे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यासंदर्भात तक्रार झाल्यानंतर सहकार विभागाने त्यांना अपात्र ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी कारवाईची मागणी केली आहे.

प्रवीण दरेकर यांना सहकारी संस्थेच्या विभागीय सहनिबंधकांनी ३ जानेवारी २०२२ रोजी मजूर म्हणून अपात्र घोषित केले आहे. दरेकर हे मजूर या संवर्गाची अर्हता धारण करत नाहीत. तथापि ते मागील अनेक वर्षांपासून संचालक आणि अध्यक्ष म्हणून मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर काम करत आहेत. दरेकर यांनी फसवणूक करुन सदस्यता मिळवलेली असल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७८ अ नुसार ते पुढील एक वर्षासाठी कोणत्याही प्रवर्गातून सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र ठरत नाहीत. त्यामुळे दरेकर यांनी केलेल्या फसवणुकीसाठी त्यांच्यावर भारतीय फौजदारी संहिता मधील कलम १९९, २००, ४२० आणि ३७ तसेच अन्य उचित कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मलिक यांनी पत्रात केली आहे.


हेही वाचा : हँड सँनिटाइझरची भेसळ उघडकीस, कारखान्याच्या धाडीत १९ लाखांचा माल जप्त


 

First Published on: January 4, 2022 9:22 PM
Exit mobile version