कुर्ला येथील कथित जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी मलिक यांच्याविरुद्ध 5 हजार पानांचे आरोपपत्र

कुर्ला येथील कथित जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी मलिक यांच्याविरुद्ध 5 हजार पानांचे आरोपपत्र

कुर्ला येथील कथित जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध गुरुवारी अंमलबजावणी संचालनायाने (ईडी) 5 हजार पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात एकूण 9 खंड असून 52 परिशिष्ठ असल्याचे सांगण्यात आहे. नवाब मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून आरोपपत्र सादर झाल्याने त्यांच्या वतीने पुन्हा कोर्टात जामिनासाठी अर्ज केला जाऊ शकतो असे सांगण्यात आले. फेब्रुवारी महिन्यांत राष्ट्रीय तपास पथकाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, अनिस इब्राहिम, छोटा शकील, जावेद पटेल ऊर्फ जावेद चिकना, टायगर मेमन यांच्यासह इतर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. यावेळी या अधिकार्‍यांनी दाऊदसह त्याची बहीण हसीना पारकर यांच्या कथित गैरव्यवहारासह जमीन खरेदी-विक्रीच्या काही प्रकरणांचा तपास सुरू केला होता.

याचदरम्यान कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड येथील संपत्ती नवाब मलिक यांनी खरेदी केल्याचे उघडकीस आले होते. ही जमीन दाऊद इब्राहिमशी संबंधित सहकारी आणि नातेवाईकांच्या नावे होती. ती जमीन नंतर नवाब मलिक यांच्याकडून खरेदी करण्यात आली होती. याच प्रकरणात ईडीने गुन्हा नोंदवून नवाब मलिक यांची कसून चौकशी केली होती. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अटकेनंतर ईडीच्या अधिकार्‍यांनी गोवावाला कंपाऊंड परिसरातील पाहणी, पंचनामा करुन काहींची चौकशी केली होती.

त्यांची जबानी नोंदविण्यात आली होती. त्यानंतर नवाब मलिक यांच्यावर मनी लाँड्रींगप्रकरणी गुन्हा नोंदवून त्यांच्या गोवावाला कंपाऊंड, कुर्ला आणि वांद्रे येथील संपत्ती जप्त करण्यात आली होती. याच प्रकरणात यापूर्वी ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याचीही चौकशी करून त्याची जबानी नोंदवून घेतली होती. त्यानंतर नवाब मलिक याच्या मुलाला चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले होते. याच गुन्ह्यांत त्याला त्यांचे दोन्ही मुले चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी नवाब मलिक यांच्याविरुद्ध ईडीने 5 हजार पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. त्यासाठी एका विशेष पेटीचा वापर करण्यात आला होता. याच पेटीतून आरोपपत्र आणण्यात आले होते.

First Published on: April 22, 2022 5:59 AM
Exit mobile version