मुख्यमंत्री – शरद पवारांमध्ये चड्ड्यांवरून झाली टीका-टिप्पणी!

मुख्यमंत्री – शरद पवारांमध्ये चड्ड्यांवरून झाली टीका-टिप्पणी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शरद पवार

राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच सर्वच पक्षांचे नेते विरोधी पक्षातल्या नेत्यांना टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान, असाच एक कलगीतुरा रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगताना पाहायला मिळाला. मात्र, या दोघांनी एकमेकांच्या चड्ड्यांवरून केलेल्या वक्तव्यामुळे उलट-सुलट चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अत्यंत संवेदनशील म्हणून ओळख असणाऱ्या या नेत्यांकडून अशा प्रकारे कंबरेखालची टिप्पणी होणं अनेकांना रुचलेलं दिसत नाही.

याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. माढ्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यासाठीच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवारांनी भाजपमध्ये गेलेल्या मोहिते पाटलांवर टीका केली. मात्र, यावेळी पवारांनी शेलक्या शब्दांमध्ये टिप्पणी देखील केली. ‘तुम्ही तिकडे गेलात, आता त्यावर काही बोलायचं नाही. फक्त आता हाफ पँट घालून तिथे जाऊ नका. एवढं करा. तुमचे पाय आणि मांड्या बघण्याची वेळ आमच्यावर आणू नका’, अशा शब्दांत शरद पवारांनी आरएसएसचा उल्लेख न करता टीका केली.

दरम्यान, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये बोलताना प्रत्युत्तर दिलं. ‘पवारसाहेब आता म्हणतायत की चड्ड्या घालून तिकडे जाऊ नका, तुमचे पाय-मांड्या बघण्याची वेळ आमच्यावर आणू नका. पण आता चड्ड्या घालत नाहीत, तर फुल पँट घालतात. आणि याच चड्डीवाल्यांच्या पाठिंब्यावर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला होतात हे विसरलात का? २३ मेला कुणाची चड्डी उतरते ते कळेलच’, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर टीका केली. दरम्यान, शरद पवारांनी ही टिप्पणी केल्यानंतर सोशल मीडियावर देखील त्यावरून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राजकारण खालच्या पातळीवर जाऊ लागल्याचं बोललं जात आहे.

First Published on: April 21, 2019 6:41 PM
Exit mobile version