जनता हुशार, राजकारणी चुकल्यावर धडा शिकवते; श्रीलंकेतील अराजकतेवरून पवारांचा केंद्राला टोला

जनता हुशार, राजकारणी चुकल्यावर धडा शिकवते; श्रीलंकेतील अराजकतेवरून पवारांचा केंद्राला टोला

श्रीलंका आणि पाकिस्तानातील जनता महागाईमुळे प्रचंड त्रस्त झाली आहे. वाढत्या महागाईचा जाब विचारण्यासाठी संतापलेल्या अवस्थेत जनता रस्त्यावर उतरली आहे. भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे देश अजूनही एकसंध आहे. देशात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली होती. तेव्हा त्यांचे सरकार पाडण्यात आले होते. देशातील जनता हुशार आहे. नेते चुकत असतील तर त्यांना धडा शिकवते, असे वक्तव्य करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या केंद्रातील मोदी सरकारला टोला लगावला.

शरद पवार गुरुवारी पुरंदरमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी शरद पवार यांनी श्रीलंका आणि पाकिस्तानमधील अराजकतेवर भाष्य केले. शरद पवार म्हणाले की, तेथे देशात प्रचंड आर्थिक संकट आहे. श्रीलंकेत राज्यकर्त्यांच्या हातातील सत्ता गेल्यासारखी आहे. लोक रस्त्यावर आहेत. पाकिस्तानमध्येही पंतप्रधानांना काढून टाकण्यात आले. भुट्टो जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांची हत्या झाली. अनेकांची उदाहरणे या ठिकाणी सांगता येतील. आपल्याकडे नोटबंदीच्या काळात अर्थव्यवस्था संकटात आली. ज्या निर्णयात लोकांना सहभागी करायचे असते, ते केले नाही. कोरोना काळात एके दिवशी सांगितले की सगळ्यांनी थाळ्या वाजवा. त्याप्रमाणे लोकांनी थाळ्या वाजवल्या, परंतु कोरोनावर हे उत्तर नव्हते, असेही शरद पवार म्हणाले.

कवितेच्या माध्यमातून प्रत्युत्तर
भाजपने बुधवारी शरद पवार यांचा एक व्हिडीओ ट्विट करीत पवारांवर टीका केली होती. या व्हिडीओत शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची एक कविता म्हटली होती. भाजपच्या टीकेनंतर शरद पवार यांनी पुण्यात पुन्हा ती कविता वाचली आणि भाजपला प्रत्युत्तर दिले. ‘आम्ही पाथरवट’ या कवितेत कष्टकर्‍यांच्या वेदना आहेत. त्याचा कोणी गैरप्रचार करीत असेल, तर त्यांनी अवश्य करावा, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

First Published on: May 13, 2022 6:36 AM
Exit mobile version