राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील राज्यपालांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील राज्यपालांच्या भेटीला

शरद पवार यांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

राज्यातील विरोधी पक्ष वारंवार राज्यपालांना भेटायला जात असल्याची टीका महाविकास आघाडीतील काही मंत्री करत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राज्यपालांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार प्रफुल पटेल देखील उपस्थित होते. भगतसिंह कोश्यारी राज्यपाल पदावर आल्यापासून शरद पवारांनी पहिल्यांदाच राजभवनावर जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीबाबत प्रफुल पटेल यांनी ट्विटरवर थोडक्यात तपशील दिला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्दयांची चर्चा केली असल्याचे पटेल यांनी सांगितले आहे.

सरकार आणि राज्यपाल यांच्यात विविध विषयावरुन वाद निर्माण झालेला असताना शरद पवारांनी राज्यपालांची भेट घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी देण्यावरुन महाविकास आघाडी आणि राजभवन यांच्यात काही काळ तणाव पाहायला मिळाल. त्यानंतर उद्धव ठाकरे हे विधानसभा नियुक्त सदस्यांतून विधानपरिषदेवर निवडून गेले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील राजभवनावर जाऊन राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली होती. तसेच दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीसुद्धा राज्यपालांची भेट घेऊन त्यांना अगदी वाकून नमस्कार केला होता. या फोटोमागे कोणता अर्थ दडलाय? याची देखील राजकीय वर्तुळात खमंग चर्चा झाली होती.

सध्या राज्यपालांनी राजभवनावर नेमण्यात येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण स्वतःकडे असावे अशी मागणी लावून धरली आहे. तर विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परिक्षा घेण्यावरुनही सरकार आणि राज्यपाल यांच्यात विरोधाभास आहे. आजच सामनाच्या अग्रलेखात याच मुद्दयावरुन राज्यपालांना पुन्हा लक्ष्य करण्यात आले आहे. आता या सर्व मुद्द्यावर शरद पवार त्यांच्या पद्धतीने पडदा टाकणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

First Published on: May 25, 2020 1:33 PM
Exit mobile version