असा राज्यपाल महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही – शरद पवार

असा राज्यपाल महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही – शरद पवार

 केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सोमवारी आझाद मैदानावर शेतकर्‍यांचा मोर्चा धडकला. या मोर्चात हजारो आंदोलक सहभागी झाले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने या मोर्चाला पाठिंबा दिल्यामुळे मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात होते. मात्र, शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिक मोर्चात दिसलेच नाहीत. या मोर्चाचे शिष्टमंडळ राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन देणार होते. मात्र, राज्यपाल गोव्याला गेल्यामुळे शेतकरी संघटनांचे नेते संतप्त झाले. त्यांनी आझाद मैदानावरील सभेतच राज्यपालांना देण्याचे निवेदन फाडून टाकले. सभेला संबोधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीका केली. कंगना राणावत हिला भेटण्यासाठी आपल्या राज्यपालांकडे वेळ आहे; पण आमच्या शेतकर्‍यांसाठी वेळ नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल झाला नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली. मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघाला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी मोर्चाला मेट्रो सिनेमा येथेच अडवले. सोमवारी या मोर्चाचा मुक्काम आझाद मैदानावर असणार आहे. मंगळवारी प्रजासत्ताक दिनी सकाळी झेंडावंदन केल्यानंतर मोर्चा विसर्जित करण्यात येणार आहे.

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना पाठिंबा म्हणून व अन्य काही मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी संघटनांनी सोमवारी मुंबईतील आझाद मैदानावर संयुक्त मोर्चा काढला आहे. अनेक संघटना यात सहभागी झाल्या असून महाविकास आघाडीतील पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला होता. मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. मात्र, शिवसेनेचा एकही नेता अथवा शिवसैनिक नव्हते. शेतकर्‍यांना पाठिंबा म्हणून शरद पवार हे स्वत: आंदोलनस्थळी गेले होते. तिथे त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. ‘देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात मुंबईने आक्रमकपणाची भूमिका घेतली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईतील कष्टकरीवर्ग रस्त्यावर उतरला. यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोक मुंबईला आले आहेत, असे म्हणत, पवार यांनी सर्व मोर्चेकर्‍यांचे आभार मानले.

मोर्चानंतर शेतकर्‍यांचे एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला जाणार आहे. त्यांना निवेदन देणार आहे. हे माहीत असूनही राज्यपाल गोव्याला गेले. त्यावरून शरद पवारांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडले. ‘महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल झाला नाही. त्यांना कंगना राणावतला भेटायला वेळ आहे; पण शेतकर्‍यांसाठी वेळ नाही. शेतकर्‍यांचं शिष्टमंडळ केवळ त्यांना निवेदन देणार होते. राज्यपालांनी त्यांना भेटणे गरजेचे होते. ही त्यांची जबाबदारी होती,’ असे पवार म्हणाले.

थोरातांची केंद्र सरकारवर टीका
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत दोन महिन्यांपासून सुरु असलेले आंदोलन इतिहास घडवणारे आहे. या कायद्याविरोधात पंजाब हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर कडाक्याच्या थंडीत मोदी सरकारने शेतकर्‍यांवर थंड पाण्याचा मारा केला तरीही शेतकरी मागे हटला नाही. आझाद मैदानातील हा एल्गार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची ताकद वाढवणारा ठरणार असून तो देशाला दिशा देणारा ठरणार आहे. मोदी सरकारने कामगार व शेतकर्‍यांच्या अस्तित्वावरच घाला घातला असून आता तुमचा सातबारा (७/१२) भांडवलदारांच्या नावावर करण्याचा डाव रचला आहे, अशी घणाघाती टीका थोरात यांनी केली.

पोलिसांशी झटापट
रविवारी संध्याकाळपासून आझाद मैदानात धरणे धरणार्‍या शेतकरी आंदोलकांनी राजभवनाच्या दिशेने कूच केली आहे. मात्र, मोठ्या संख्येने हे मोर्चेकरी राजभवनाच्या दिशेने निघाल्याने पोलिसांनी या आंदोलकांना मेट्रो सिनेमा येथे अडवले. त्यामुळे मोर्चेकरी आणि शेतकर्‍यांमध्ये झटापट झाली. त्यामुळे मोर्चेकर्‍यांनी ‘दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा देत रस्त्यावरच एल्गार पुकारल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला.अजित नवले, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, तिस्ता सेटलवाड, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि सचिन सावंत आदी नेते मोर्चेकर्‍यांसोबत राजभवनाकडे निघाले होते.

निवेदन फाडले
सोमवारी दुपारी चार वाजताची वेळ आम्हाला राज्यपालांनी भेटीसाठी दिली होती. तरीही वाटाण्याच्या अक्षता दाखवत गोव्याला मजा मारायला राज्यपाल निघून गेले. शेतकर्‍यांच्या प्रश्नाबाबत गांभीर्य नसलेल्या राज्यपालांचा आम्ही निषेध करत असल्याचे म्हणत संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी राज्यपालांना देण्यात येणारे निवेदन सर्वांसमक्ष फाडून निषेध व्यक्त केला आहे. भेटीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल उपलब्ध नसल्याने आता शेतकर्‍यांचे निवेदन थेट राष्ट्रपतींना देणार असल्याचे यावेळी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. तत्पूर्वी, आज राज्यपालांना देण्यासाठी आणलेले निवेदन अजित नवले, अशोक ढवळे, भाई जगताप, विद्या चव्हाण, सचिन सावंत इत्यादी नेत्यांच्या उपस्थितीत फाडून टाकण्यात आले.

First Published on: January 26, 2021 6:55 AM
Exit mobile version