राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘त्या’ १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘त्या’ १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी!

अहमदनगर महानगरपालिका निवडणूक

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अहमदनगरमध्ये मोठा फटका बसला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांना पक्षाने बडतर्फ केलं आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या नवनिर्वाचित नगरसेवकांना बडतर्फीची नोटीस पाठवली आहे. या १८ नगरसेवकांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही जिल्हाध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले आहे. भाजपला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर या सर्व नगरसेवकांना आधी कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली होती. त्यानंतर ही बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

भाजपला दिला विनाशर्त पाठिंबा

नुकत्याच झालेल्या अहमदनगर महानगर पालिका निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा घेतल्याशिवाय सत्ता स्थापना करणं अशक्य होतं. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपला पाठिंबा न देण्यासंदर्भात नवनिर्वाचित सदस्यांना बजावले होते. मात्र असे असले, तरी राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांनी महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला विनाशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे अहमदनगर महानगर पालिकेची सत्ता शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेली असताना भाजपने त्यावर मोहोर उमटवली.

पक्षादेश डावलणं भोवलं!

दरम्यान, पक्षादेश डावलल्यामुळे या सर्व नगरसेवकांना खुलासा करण्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावर पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांकडून कोणताही खुलासा प्राप्त न झाल्यामुळे अखेर या नगरसेवकांना बडतर्फ करण्यात आलं आहे. ‘महापौरपदासाठी जातीयवादी पक्षांना पाठिंबा देऊ नये असे स्पष्ट आदेश दिलेले असताना देखील पक्षादेश डावलून भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. तसेच, पक्षाच्या नोटिशीला देखील उत्तर न दिल्यामुळे आपल्याला पक्षातून काढून टाकण्यात येत आहे’, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

First Published on: January 12, 2019 4:20 PM
Exit mobile version