आदित्य ठाकरेंना भिडणाऱ्या नेत्याला राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी

आदित्य ठाकरेंना भिडणाऱ्या नेत्याला राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी

अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी माजी मंत्री शशिकांत शिंदे (सातारा) आणि अमोल मिटकरी (अकोला) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील अशी खात्री प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आज शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्याला संधी देऊन राष्ट्रवादीने बॅलन्स साधला आहे. यापैकी अमोल मिटकरी हे विधानसभा निवडणुकीत आपल्या भाषणांमुळेच चांगलेच गाजले होते. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरील टीकेमुळे ते सोशल मीडियावर लोकप्रिय झाले होते.

राष्ट्रवादीने घोषित केलेल्या नावांपैकी शशिकांत शिंदे हे नाव महाराष्ट्राला परिचित आहे. साताऱ्यातील कोरेगाव या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी राज्यात विविध खात्याचे मंत्री म्हणूनही काम केले होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता. तर दुसरे उमेदवार आहेत अमोल मिटकरी. अकोल्यातील या युवकाने विधानसभा निवडणुकीत जाहीर सभा आपल्या वक्तृत्वाने गाजविल्या होत्या. राष्ट्रवादीने काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेपासून अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीच्या मंचावर दिसू लागले होते.

विधानसभेच्या जाहीर भाषणात अनेकदा अमोल मिटकरी यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली होती. खासकरुन जस्टिन बिबरच्या भेटीचा किस्सा मिटकरी प्रत्येक भाषणात द्यायचे. तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर देखील मिटकरी यांनीच पुढाकर घेऊन तिथीचा हट्ट सोडून तारखेप्रमाणे जयंती साजरी करण्याचे आवाहन शिवसेनेला केले होते.

 

 

विधानपरिषेदत मात्र आता राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र असल्यामुळे मिटकरींना आदित्य ठाकरे यांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे आता निवडणुकीची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला ही निवडणूक बिनविरोध करायची आहे. मात्र काँग्रेसने हट्टाला पेटून दोन उमेदवार उभे केले आहेत.

First Published on: May 10, 2020 3:29 PM
Exit mobile version