केंद्राने राज्याला अंधारात ठेवल्यानेच बोगस लसीकरणाचे प्रकार; नवाब मलिकांची टीका

केंद्राने राज्याला अंधारात ठेवल्यानेच बोगस लसीकरणाचे प्रकार; नवाब मलिकांची टीका

राज्यात लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र, काही ठिकाणी बोगस लसीकरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राज्यात विशेषत: मुंबईत बोगस लसीकरण झाल्याचे प्रकरण समोर आल्याने एसआयटीमार्फत तपास करण्यात येत आहे. मात्र केंद्राने राज्याला अंधारात ठेवल्याने ही घटना घडल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

लसीकरणाचा बोगसपणा होण्याचे मुख्य कारण खासगी लोकांना व खासगी हॉस्पिटल यांना लस वितरीत करण्यात आली. त्याची माहिती राज्यांना देण्यात आलेली नाही किंवा डाटा राज्याला शेअर करण्यात आलेला नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले. सुरुवातीपासून जर खासगी लोकांना लस देत असताना राज्यांना माहिती दिली असती तर नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक यंत्रणा आहेत त्या यंत्रणा त्यावर नियंत्रण ठेवू शकल्या असत्या आणि अशा प्रकारचा बोगसपणा झाला नसता असा टोला नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

मलिक यांची राज्यपालांच्या पत्रावर नाराजी

ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही अशा शब्दात नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या पत्रावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र राजकीय उद्देश ठेवून लिहिण्यात आले असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्यपालांनी पत्रात उल्लेख केला आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्याच्या निर्णयामुळे नाही हे त्यांना माहीत असायला हवे होते असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

 

First Published on: July 1, 2021 4:21 PM
Exit mobile version