‘मुंबई मॉडेल’ची कौतुक पचत नसल्याने फडणवीस खोटी माहिती पसरवताहेत – नवाब मलिक

‘मुंबई मॉडेल’ची कौतुक पचत नसल्याने फडणवीस खोटी माहिती पसरवताहेत – नवाब मलिक

जगभर महाराष्ट्राच्या कामाची नोंद लोक घेत आहेत. मुंबई मॉडेलची चर्चा होतेय हे पचत नसल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचे काम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

कोरोनाच्या बाबतीत गंभीरतेने राज्य सरकार काम करत आहे. कोरोना पॉझिटिव्हचा आकडा किंवा मृतांचा आकडा लपवला नाही. राज्यात ६ हजार २०० लॅब तयार करण्यात आले. जास्तीत जास्त आरटीपीसीआरच्या टेस्ट करण्यात आल्या. ही सर्व माहिती उघडपणे जनतेसमोर ठेवल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. सुप्रीम कोर्ट असेल किंवा विविध कोर्ट असतील, नीती आयोग यांनी कामाची प्रशंसा केली हेच विरोधी पक्षनेत्याला पचत नाहीय अशी खोचक टिकाही नवाब मलिक यांनी केली.

गुजरातमध्ये ७१ दिवसात ६१ हजार कोरोना पॉझिटिव्ह केसेस लपवण्यात आल्याची बातमी समोर येतेय. गोव्यात ऑक्सिजन मिळत नसल्याने रोज लोकांचा मृत्यू होतोय. उत्तर प्रदेशमध्ये २ हजार लोकांचे मृतदेह नदीमध्ये फेकण्यात आल्याची बातमी आहे. म्हणजे जिथे – जिथे डबल इंजिनचं सरकार आहे ते विफल झालेय असे दाखवून महाराष्ट्रातील चांगलं काम पचत नाहीय. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा उद्योगच यांनी सुरु केलाय असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगली कामे दिसत नसेल तर मग इलाज करु शकत नाही. मात्र महाराष्ट्रात चांगली कामे होत आहेत ही सत्य परिस्थिती आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

 

First Published on: May 16, 2021 4:35 PM
Exit mobile version