मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना झेड सिक्युरिटी आधीही होती आणि आताही आहे; शरद पवारांनी केले स्पष्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना झेड सिक्युरिटी आधीही  होती आणि आताही आहे; शरद पवारांनी केले स्पष्ट

एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असाताना त्यांनी नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याचे धमकी पत्र आले होते. हे प्रकरण जुने असले तरी शिंदे गटातील आमदारांनी प्रकरण नव्याने समोर आणत त्यावर चर्चा सुरु केली आहे. नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असतानाही शिंदे यांना झेड सुरक्षा देण्यास माजी मुख्यमंत्री आण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नकार दिल्याचा आरोप शिंदे समर्थक आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. तर आमदार शंभूराज देसाई यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. दरम्यान या प्रकरणावरून राजकीय वाद रंगत असताना यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील उडी घेतली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना झेड सिक्युरिटी आधीही होती आणि आताही आहे अस स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे.

शरद पवार म्हणाले की, राज्य सरकारने कोणाला सुरक्षा द्यायची नाही द्यायची यासंदर्भातील चर्चेचे फोरम कॅबिनेट असत नाही. ही कॅबिनेटमध्ये चर्चा होत नाही. ही चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्याची शिफारस करण्यासाठी मुख्य सचिव, गृह सचिव अशा सिनियर अधिकाऱ्यांच्या एका कमिटीसमोकर सुरक्षा प्रदान करण्यासंदर्भातील निर्णय घेतले जातात. आजच सकाळी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आणि माझी भेट झाली. या भेटीदरम्यान वळसे पाटील यांनी स्पष्ट सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरिटी या आधीही झेड प्लस सुरक्षा होती आणि आत्ताही आहे. याशिवाय गडचिरोलीचे काम त्यांच्याकडे असल्याने त्यासाठी अॅडशनल फोर्स त्यांना दिली होती. त्यामुळे हे माजी गृहमंत्र्याकडून ऐकलं त्यामुळे यावर अधिक चर्चांची गरज वाटत नाही. अस स्पष्ट मत पवारांनी व्यक्त केलं आहे. दोघांनी मिळून सत्ता चालवायचं ठरलं आहे. त्यामुळे जे काही करतील ते स्विकारायला हवं. असही पवार म्हणाले.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून होत असलेल्या आरोपांना आता खुद्द राज्याचे माजी गृहमंत्री  दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले आहे. दरम्यानच्या काळात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ‘झेड’ सुरक्षा दिली होती. एवढेच नाहीतर शिंदे यांना नक्षलावाद्यांकडून आलेल्या धमकीनंतर पोलीस विभागाला विशेष सूचना देण्यात आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्या महाविकास आघाडी काळातील सुरक्षेवरून रंगलेल्या वादावर दिलीप वळसे पाटलांनी पडदा पाडला आहे.


हेही वाचा : शिवसेना कोणाची? संजय राऊतांनी दिली पुराव्यांची यादी


First Published on: July 23, 2022 1:12 PM
Exit mobile version