राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं पुण्यात निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं पुण्यात निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे शुक्रवारी पुण्यात निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे सांगितले जात असून त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादीवर शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घेतली होती.

पुण्यात उपचारादरम्यान निधन

दरम्यान भारत भालके यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालवली. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे दाखल करण्यात आले होते. मात्र न्युमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती ढासळत गेली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता. गुरुवारी रात्रीपासून भारत भालके यांची तब्येत सातत्याने खालावत गेली. कोरोनामुळे त्यांच्या अवयवांवर परिणाम झाला होता. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. गेल्या काही तासांपासून ते व्हेंटिलेटर होते.

पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. १९९२ साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. २००२ पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे. भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले.


ठाकरे सरकार वर्षपूर्ती : उद्धव ठाकरे सपशेल फेल – अविनाश जाधव

First Published on: November 28, 2020 8:52 AM
Exit mobile version