मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, प्रकाश सोळंके नाराज

मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, प्रकाश सोळंके नाराज

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आणि मकरंद आबा पाटील

महा विकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होताच तीनही पक्षातील नाराजी आता चव्हाट्यावर येत आहे. शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद देताना अनेक ज्येष्ठ सदस्यांना डावलले, त्यामुळे काही आमदार दबक्या आवाजात आपली नाराजी प्रकट करत असतानाच आता राष्ट्रवादीतूनही उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. बीडमधील माजलगाव मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके यांना मंत्रिपदापासून डावलल्यामुळे ते नाराज आहेत. तर सातारा जिल्ह्यातील वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद आबा पाटील देखील नाराज असल्याचे कळत आहे.

मकरंद आबा पाटील यांना डावलून कराडचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रिपद दिल्यामुळे ते नाराज आहेत. त्यामुळे मकरंद पाटील यांच्या जवळचे सहकारी आणि वाई पंचायत समितीचे उपसभापती अनिल बुवासाहेब जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी मकरंद पाटील यांनी जीवाचे रान केले. सातारा जिल्ह्यात एक नंबरचे मताधिक्य घेऊन मकरंद आबा निवडून आले, तरी सुद्धा मकरंद आबांना संभाव्य मंत्रीमंडळात डावलले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयामुळे मी नाराज झालो असून मी आज वाई पंचायत समितीच्या उपसभापतीपदाचा राजीनामा देत आहे, तरी तो मंजूर करावा.” असे पत्रच जगताप यांनी पक्षाला पाठवले आहे.

मकरंद आबा पाटील हे २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सातारा जिल्ह्यातून शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही मकरंद आबा पाटील हे राष्ट्रवादीसोबत खंबीरपणे उभे राहिले होते. त्यामुळे त्यांना देखील मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती.

तर प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते आहेत. माजलगाव विधानसभा मतदारसंघातून ते चौथ्यांदा निवडून आलेले आहेत. त्यांच्या नंतर पक्षात आलेल्या धनंजय मुंडेंना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात आपले स्थान दुय्यम झाली असल्याची भावना सोळंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. तसेच यावर्षी पहिल्यांदाच आमदार झालेल्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडलेली असताना आपल्यासारख्या ज्येष्ठाला का डावलण्यात आले? असा थेट सवाल सोळंके यांनी पक्षश्रेष्ठींना विचारला आहे. प्रकाश सोळंखे यांनी उद्या विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची वेळ मागितली आहे. त्यामुळे या भेटीत ते राजीनामा देतात की त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची मनधरणी करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First Published on: December 30, 2019 10:05 PM
Exit mobile version