सरकारने आणला कॅसिनो कायदा; ‘अनुभवी’ बावनकुळेंना अध्यक्ष करण्याचा रोहित पवारांचा खोचक सल्ला

Winter Session 2023 नागपूर – कॅसिनोवरुन विरोधकांनी सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला घेरले असताना महाराष्ट्रातील महायुती सरकारने कॅसिनो संबंधीचे विधेयक पहिल्याच दिवशी विधानसभेत आणले आहे. त्यावरुन रोहित पवारांनी चंद्रशेखर बावनकुळेंना चिमटा काढला आहे. ‘या संबंधीचा कायदा करण्यापूर्वी ज्येष्ठ अनुभवी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी’, असा टोला रोहित पवारांनी (Rohit Pawar) लगावला आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. शेतकरी प्रश्न आणि बेरोजगारीवरुन विरोधक – सत्ताधारी यांच्यात अधिवेशनात जुंपण्याची शक्यता आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षासह (BJP) सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘कॅसिनो’वर आणलेल्या विधेयकावरुन रोहित पवारांनी सरकारला चिमटा काढला आहे.

काय आहे सोशल मीडिया पोस्टमध्ये?

रोहित पवारांनी गोंधळलेले निकामी सरकार अशा हॅश्टॅगसह ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे, “राज्यात पेपरफुटीने त्रस्त झालेल्या युवांची याबाबत कठोर कायदा करण्याची मागणी आहे. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याबाबत विधेयक आणलं जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली.

परंतु या सरकारने कॅसिनोच्या ‘महत्त्वाच्या’ विषयावर मात्र पहिल्याच दिवशी विधेयक आणलं… हा कायदा करण्यापूर्वी ज्येष्ठ ‘अनुभवी’ नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन त्यांच्याकडे हे विधेयक पाठवण्यात यावं, ही विनंती!” असे म्हणत त्यांनी बावनकुळेंना चिमटा काढला आहे.

बावनकुळेंचा उल्लेख का?

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी बावनकुळे यांचे मकाऊ येथील कॅसिनोमधील फोटो समाज माध्यमावर शेअर केले होते. राऊतांनी आरोप केला होता, की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती असताना, मराठा-ओबीसीवरुन सामाजिक वातावरण बिघडलेले असताना परदेश दौऱ्यावर असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका रात्रीत कॅसिनोमध्ये साडेतीन कोटी रुपये उडवले. बावनकुळेंचे फोटो ट्विट करुन महाराष्ट्र पेटलेला असताना ते मकाऊमध्ये कॅसिनोत जुगार खेळत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. कॅसिनोत गेलो होतो, मात्र जुगार खेळला नव्हता, असे स्पष्टीकरण त्यानंतर बावकुळेंनी दिले होते.

रोहित पवारांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की ‘राज्यात पेपरफुटीने त्रस्त झालेल्या युवांची याबाबत कठोर कायदा करण्याची मागणी आहे. परंतू या सरकारने कॅसिनोच्या ‘महत्त्वाच्या’ विषयावर मात्र पहिल्याच दिवशी विधेयक आणलं… हा कायदा करण्यापूर्वी ज्येष्ठ ‘अनुभवी’ नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन त्यांच्याकडे हे विधेयक पाठवण्यात यावं, ही विनंती!’

First Published on: December 7, 2023 12:41 PM
Exit mobile version