शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती स्थिर

शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती स्थिर

शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

शरद पवार यांना ११ एप्रिल रोजी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. १२ एप्रिल रोजी त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेतल्यानंतर आज शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची तब्येत बरी आहे. देशभरातील जनतेने, चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या शिवाय दिलेल्या पाठिंब्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

गेल्या १५ दिवसांमध्ये शरद पवार यांच्यावर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ३० मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सात दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर १२ एप्रिलला पुन्हा एकदा त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली. यापूर्वीच शस्त्रक्रिया ही डॉ. अमित मायदेव यांनी केली होती.

First Published on: April 15, 2021 12:29 PM
Exit mobile version