सत्तेचा पुरेपूर गैरवापर म्हणजे ‘ऑपरेशन लोटस’ – शरद पवार

सत्तेचा पुरेपूर गैरवापर म्हणजे ‘ऑपरेशन लोटस’ – शरद पवार

कर्नाटक, मध्यप्रदेशनंतर आता राजस्थानमध्येही सत्तेतील सरकार अस्थिर करण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू आहे. महाराष्ट्रातही ‘ऑपरेशन लोटस’ राबवलं जाण्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या या ऑपरेशन लोटसवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सडकून टीका केली आहे. ‘ऑपरेशन लोटस’ हे दुसरं तिसरं काही नसून सरळ सरळ सत्तेचा गैरवापर आहे. केंद्राच्या सत्तेचा पुरेपूर गैरवापर करणं म्हणजेच ऑपरेशन लोटस आहे, अशा शब्दांत राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.

राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’साठी दिलेल्या मुलाखतीत ‘ऑपरेशन लोटस’वर सडकून टीका केली आहे. “ऑपरेशन लोटस याचा अर्थ सरळ सरळ सत्तेचा गैरवापर करून लोकांनी निर्माण केलेली सरकारं दुबळी करणं, डीस्टॅबिलाईज (अस्थिर) करणं आणि त्याच्यासाठी केंद्राच्या सत्तेचा पुरेपूर गैरवापर करणं,” असं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटसनुसार राज्यातील ठाकरे सरकार पाडणार असल्याची चर्चा आहे. संजय राऊतांच्या या प्रश्नावर शरद पवारांनी ऑपरेशन लोटस असो की आणखी काही, त्याचा काहीही परिणाम उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर होणार नाही, असं म्हटलं. “पहिल्यांदा तीन महिन्यांत सांगत होते.. नंतर आता सहा महिने झाले… आता सहा महिने झाल्याच्या नंतर सप्टेंबरचा वायदा आहे. काही लोक ऑक्टोबरचा करतायेत. माझी खात्री आहे की, पाच वर्षे हे सरकार उत्तम रीतीने राज्याचा कारभार करेल आणि ऑपरेशन लोटस असो की आणखी काही, त्याचा काहीही परिणाम उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर होणार नाही,” असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या चेम्बरमध्ये झालेल्या चर्चेचा पवारांकडून खुलासा


 

First Published on: July 13, 2020 9:22 AM
Exit mobile version