Modi vs Pawar: तुम्हीच सांगा मोदी जी शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला? पवारांच्या आमदाराने थेट पंतप्रधानांना केला सवाल

Modi vs Pawar: तुम्हीच सांगा मोदी जी शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला? पवारांच्या आमदाराने थेट पंतप्रधानांना केला सवाल

देशाचा मूड हा मोदीविरोधी आहे - शरद पवार

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माळशिरस येथील प्रचार सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राचे कद्दावर नेता म्हणत पवारांच्या कृषिमंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेल्या कामापेक्षा मोदी सरकारने शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा मिळवून दिल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी पलटवार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस महाराष्ट्रात मुक्कामी होते. दोन दिवसांत त्यांनी सहा प्रचारसभांना संबोधित केले. मंगळवारी सकाळी माळशिरस येथे झालेल्या सभेत पंतप्रधानांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवारांनी सोशल मीडियावरुन उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मोदींच्या दहा वर्षांत उसाची एफआरपी 210 रुपयांवरुन 340 रुपयांवर केल्याचे त्यांनी सांगत स्वतःचे भरभरुन कौतुक करुन घेतले. तुम्ही दीडपट म्हणजे 61% वाढ केली.

शरद पवार यांच्या कार्यकाळात किती एफआरपी वाढली याचा तपशील देत रोहित पवार म्हणाले, शरद पवार केंद्रात कृषिमंत्री झाले तेव्हा उसाची एफआरपी 74 रुपये होती, त्यांनी 220 रुपये केली, म्हणजे तिप्पट 200% वाढवली. तर मग तुम्ही त्यांचे किती कौतुक करायला हवे? असा सवाल रोहित पवारांनी पंतप्रधान मोदींना केला.

शरद पवार कृषिमंत्री असताना ऊसच नाही तर कापूस, सोयाबीन, फळबागा, कांदा उत्पादक अशा सर्वच शेतकऱ्यांनाही न्याय दिला आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.

हेही वाचा : PM Modi in Maharashtra: काँग्रेसने 60 वर्षांत केले नाही ते मोदी सरकारने 10 वर्षांत करुन दाखवले; मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका

शरद पवारांबद्दल काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, जेव्हा देशात मनमोहनसिंगांचे सरकार होते तेव्हा महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते देशाचे कृषिमंत्री होते. त्यांच्या काळात ऊसाची एफआरपी अवघे 200 रुपये होती. मोदी सरकारच्या काळात आज 340 रुपये करण्यात आली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऐरियर्ससाठी साखर आयुक्तांकडे फेऱ्या मारव्या लागत होत्या. आता ती स्थिती राहिलेली नाही. आमच्या सरकारच्या काळात शतप्रतिशत परतावा दिला जात आहे.
2014 मध्ये ऊसाचे एरियर्स 57 हजार कोटी दिला जात होता. यावर्षी 1 लाख 14 हजार कोटींचे पेमेंट आमच्या सरकारने केले आहे. यातील 32 हजार कोटी रुपये हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाल्याचे मोदी म्हणाले.

साखर कारखाने हे इन्कम टॅक्समुळे 90च्या दशकापासून त्रस्त होते आणि हे ज्येष्ठ नेते दिल्लीत बसलेले होते. तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. मी त्यांना पत्र पाठवत होतो, भेटून सांगत होतो, वेळोवेळी समजावत होतो की तुमच्याकडेही सहकारी साखर कारखाने आहेत. मात्र या ज्येष्ठ नेत्यांनी सहकारी साखर कारखान्यांचे प्रश्न सोडवले नाही, असा आरोप पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता केला.

First Published on: April 30, 2024 6:04 PM
Exit mobile version