पवारांप्रमाणेच जयंत पाटीलही म्हणतात, शिंदे-फडणवीस सरकार पडणार!

पवारांप्रमाणेच जयंत पाटीलही म्हणतात, शिंदे-फडणवीस सरकार पडणार!

बुलढाणा – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आज नाही तर उद्या कोसळणार असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. बुलढाण्यात आयोजीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागणार असा रागरंग आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यातील विविध मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. बुलढाणा जिल्हा दौऱ्यादरम्यान मलकापूर येथे त्यंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक घेतली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधतांना जयंत पाटील यांनी राज्य सरकारचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. सुप्रीम कोर्ट हा निर्णय किती काळ लांबवेल हे सांगणे कठीण आहे. जर या देशात न्याय शिल्लक असेल तर संविधानाच्या दहाव्या सूची मधील तरतुदीनुसार बंडखोर आमदार अपात्र ठरले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. लोकशाही टिकविण्यासाठी पक्षांतर बंदी कायद्याची अंमलबजावणी होणे काळाची गरज आहे. तेव्हाच बंडखोरीच्या प्रवृत्ती आणि अशा लोकांना आळा बसेल, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाहीत –

महाविकास आघाडीमध्ये मतभेद नसल्याचा पुनरुच्चार करून ज्यावेळी सत्ता असते तेंव्हा मतभेद असू शकतात असे सूचक विधान त्यांनी केले. सत्ता गेली आहे , आता सर्वांना एकत्र येऊन भाजपाचा सामना करावा लागणार आहे. हे लक्षात घेऊन सर्व एकत्र राहतील असा आशावाद त्यांनी बोलून दाखविला.

महाविकास आघाडीत एक घटक पक्ष वाढला, पण… –

शिवसेनेने संभाजी ब्रिगेड या पक्षासोबत युती जाहीर केली या संदर्भात विचारले असता, पाटील म्हणाले की, शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेड पक्ष जोडला गेला आहे. म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये एक घटक पक्ष वाढला आहे. मात्र त्यांचे शिवसेनेसोबत नेमके काय बोलणे झाले हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आज त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही.

First Published on: August 28, 2022 7:22 PM
Exit mobile version