छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही – जयंत पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही – जयंत पाटील

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित तथ्यांची मोडतोड राष्ट्रवादी काँग्रेस कदापि सहन करणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे. (NCP will not tolerate the destruction of the history of Chhatrapati Shivaji Maharaj Says Jayant Patil)

“राष्ट्रवादी काँग्रेस हा कायमच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभा असलेला पक्ष आहे. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी मोडतोड कदापि सहन केली जाऊ शकत नाही. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित पुरावे उपलब्ध असलेली तथ्ये जशीच्या तशी दाखवावीत, कुठेही इतिहासाशी छेडछाड करू नये” असे जयंत पाटील यांनी म्हटले.

सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाच्या विकृतीकरणाचे विकृतीकरण होऊ देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट विभागाने घेतली आहे. यासोबतच केंद्रसरकार व राज्य सरकारने चित्रपट सेंसोर बोर्डावर ऐतिहासिक संशोधक मंडळातील सदस्यांची नियुक्ती करावी अशी देखील मागणी राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे.

संभाजीराजें छत्रपतींचा आक्षेप

“आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं आपण वाचत नाही, ही आपली देखील चूक आहे. त्यामुळे हे लोक इतिहासाची मोडतोड करुन आपल्यासमोर मांडतात. माझी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती आहे की, सेन्सॉर बोर्डात ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती असावी. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात दाखविण्यात आलेले मावळे हे कोणत्या दृष्टीने मावळे वाटतात? चित्रपटात ड्रामाटायझेशन आवडते म्हणून काहीही बदल करायचा का? पोस्टरमध्ये मावळ्यांची पगडी काढण्यात आली आहे. पगडी काढणे म्हणजे एक प्रकारचा शोक आहे”, असे संभाजी राजे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. याशिवाय, “इतिहासाचा गाभा धरून राहावा ना. यातील काही मावळ्यांनी पगडी घातली नसून, तो शोक संदेश आहे. जर, यापुढे प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांनी असेच चित्रपट काढले तर, गाठ संभाजी छत्रपतीशी आहे”, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट करत संभाजीराजे छत्रपती यांच्या भुमिकेला पाठिंबा दिला. “महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा चुकीचा, खोटा इतिहास मांडण्याची परंपरा पुरंदरे यांनी सुरू केली. ‘जाणता राजा’ हे महानाट्य हे त्याचे एक रुप आहे. कारण त्यांचे हे लिखित पुस्तक होते. तीच परंपरा आता चित्रपटसृष्टीतील काहीजण पुढे नेत आहेत. अशा गोष्टींना आम्ही विरोध करुच पण संभाजीराजे यांच्या रुपाने एक आवाज मिळाला आहे”, जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.


हेही वाचा – खोटा इतिहास मांडण्याची परंपरा पुरंदरेंनी सुरू केली; राष्ट्रवादीचा संभाजीराजे छत्रपतींना पाठींबा

First Published on: November 7, 2022 11:18 AM
Exit mobile version